जळगाव - कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जग हादरले आहे. कोरोनारुपाने मानव जातीच्या अस्तित्त्वावर आघात करणाऱ्या राक्षसाशी पोलीस, डॉक्टर्स आणि नर्स ही मंडळी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र लढत आहे. या 'कोरोना वॉरियर्स'प्रति जळगावातील एका युवा अभियंत्याने अनोख्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. या अभियंत्याने आपल्या अंगी असलेल्या कलेच्या माध्यमातून सुबक रंगीबेरंगी रांगोळी काढून 'कोरोना वॉरियर्स'च्या कार्याला खऱ्या अर्थाने सलाम केला आहे.
अमोल अनिल पाटील असे या अभियंत्याचे नाव असून ते जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्वर येथील रहिवासी आहेत. अमोल पाटील हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. सुबक रांगोळी काढण्याचा त्यांना बालपणापासून छंद आहे. आपल्या याच कलेच्या माध्यमातून त्यांनी 'कोरोना वॉरियर्स'च्या कार्याचे कौतूक तर केलंच आहे, शिवाय कोरोनाच्या लढ्यात प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देखील नागरिकांना केले आहे. कोरोनारुपी संसर्गजन्य विषाणू जगभरात थैमान घालत आहे. असे असताना आपणा सर्वांचे रक्षण करण्यासाठी पोलीस बांधव, वैद्यकीय कर्मचारी अन् सफाई कर्मचारी आपल्या प्राणांची बाजी लावून आपले कर्तव्य यथायोग्य पार पाडत आहेत. कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा म्हणून आपण सर्व जण आपापल्या घरात कोंडलेले आहोत. हे बांधव मात्र, स्वतःचा जीव धोक्यात घालून, आपल्या कुटुंबीयांपासून दूर घराबाहेर आपणा सर्वांच्या हितासाठी अहोरात्र झटत आहेत. एका रांगोळीच्या माध्यमातून या 'कोरोना वॉरियर्स'ना एक मानाचा मुजरा अन् त्यांच्या कर्तुत्त्वाला सलाम करण्याचा प्रयत्न अमोल पाटील यांनी केला आहे.
अमोल पाटील यांनी आपल्या घराच्या पोर्चमध्ये तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर एक सुबक रंगोळी साकारली आहे. ८ फूट बाय ८ फुट आकाराच्या या रांगोळीत विठ्ठलरुपी पोलीस बंधू, आई जगदंबारुपी वैद्यकीय अधिकारी अन् साक्षात नारायणरुपी सफाई कर्मचारी असा काहीसा वेगळा 'कॉन्सेप्ट' इम्प्लिमेंट केला आहे. अर्थात, सद्यस्थितीत हे सर्व आपणासाठी दैवतच आहेत, असा संदेश त्यांनी दिला आहे. या कोरोना योद्धांना एक मानाचा मुजरा करण्याची किंवा त्यांना थोडंसं का होईना, सहकार्य करण्याची जर खरोखर इच्छा असेल, तर फक्त घराबाहेर निघू नका... आपलं आपापल्या घरात थांबणं, हेच कोरोनाला रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकत... घरातच थांबुया, कोरोनाला रोखुया... असे आवाहन देखील त्यांनी रांगोळीच्या माध्यमातून केले आहे.