जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. या दोन्ही मतदारसंघांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते. त्याचे कारण म्हणजे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. गिरीश महाजनांना जळगावात विजयाची तर एकनाथ खडसेंना सूनबाईच्या मताधिक्क्याची चिंता आहे.
जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघात भाजपचेच खासदार मावळत्या लोकसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आता १७ व्या लोकसभेचे जळगाव आणि रावेरातून कोण प्रतिनिधित्व करतं, यावर जिल्ह्याचे नेते एकनाथ खडसे असतील की गिरीश महाजन असतील हे स्पष्ट होणार आहे.
यंदाची लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने जळगाव जिल्ह्यात कोणाचे वलय आहे, यावर शिक्कामोर्तब करणारी ठरणार आहे. आपल राजकीय वर्चस्व कायम राखता यावं म्हणून या निवडणुकीच्या काळात खडसेंनी रावेरात तर महाजनांनी जळगावात लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून आले. रावेरात सून रक्षा खडसे यांना मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणणे, हे खडसेंसाठी आव्हान असणार आहे. तर जळगावात विधानपरिषद सदस्या स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही त्यांची उमेदवारी बदलून उन्मेष पाटलांना तिकीट देणाऱ्या गिरीश महाजनांसाठी जळगावची जागा जिंकून आणणे प्रतिष्ठेचे झाले आहे.
गत निवडणुकीत जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना ३ लाख ८० हजार मतांचा लीड मिळाला होता. मात्र, यावेळी भाजपसाठी परिस्थिती खूपच प्रतिकूल आहे. पक्षातील गटबाजी, मतदानाची घटलेली टक्केवारी या बाबी प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे. लीड तर सोडाच पण जागा निवडून आली तरी भाजपला हायसे वाटेल. असे असताना उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण ८ जागांची जबाबदारी स्वीकारणारे गिरीश महाजनांना मात्र, भाजप मुसंडी मारेल, असा विश्वास आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघात मात्र जळगावच्या तुलनेत विपरित परिस्थिती आहे. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीत वाटाघाटी सुरू होत्या. दुसरीकडे भाजपच्या खासदार रक्षा खडसे या आधीच कामाला लागल्या होत्या. त्यांचे तिकीटही आधी जाहीर झाले होते. काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांना मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि खडसे विरोधकांचा फायदा होईल, असे वाटत होते. परंतु शेवटच्या क्षणी एकनाथ खडसे यांनी मतदारसंघातील सर्व समीकरणे बदलून टाकली.
सूनबाईंसाठी त्यांनी अख्खा मतदारसंघ पालथा घातला. काँग्रेसचे खिळखिळ पक्षसंघटन तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून काढता पाय घेतल्याने काँग्रेस एकाकी पडली. तुलनेत भाजप सर्वच आघाड्यांवर सरस ठरल्याने रक्षा खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यांना किती मताधिक्य मिळते, एवढीच काय ती उत्सुकता भाजप नेते आणि समर्थकांना आहे. रावेरात भाजपला अनुकूल वातावरण होते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस वगळता याठिकाणी एकही केंद्रीय मंत्री प्रचाराला आले नाहीत. खडसेंनी एकट्याने खिंड लढवली. रक्षा खडसे यांचा विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास खडसेंना आहे.