जळगाव - महापालिकेच्या रिक्त असलेल्या उपमहापौरपदाच्या निवडीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उद्यापासून (गुरुवार) या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र मिळण्यास सुरुवात होणार आहे, तर बुधवारी (दि. ११) रोजी निवडीसाठी विशेष महासभा होणार आहे. दरम्यान, या निवडीकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे. भाजपाचे नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे यांनी दि. २६ ऑक्टोबर रोजी महापौरांकडे उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त झाले आहे. रिक्त असलेल्या उपमहापौरपदाच्या निवडीसाठी सोमवारी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी उपमहापौर पदाचा निवड कार्यक्रम जाहीर झाला आहे.
असा असणार निवड कार्यक्रम -
५ ते ९ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत नामनिर्देशन पत्र मिळतील. मंगळवार, १० रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत नगरसचिवांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येतील. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, ११ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेत विशेष महासभा होईल. नामनिर्देशन पत्राच्या छाननीनंतर १५ मिनिटांचा माघारीसाठी वेळ दिला जाईल. त्यानंतर उपमहापौर यांची घोषणा केली जाणार आहे.
उपमहापौर पदासाठी या नावांची चर्चा -
उपमहापौर पदासाठी भाजपाकडून सुनील खडके, ऍड. दिलीप पोकळे, चेतन सनकत आणि दत्तू कोळी इच्छूक आहेत. सुनील खडके यांचे नाव आघाडीवर आहे. ज्याप्रमाणे स्थायी सभापती पदाची निवड बिनविरोध झाली, त्याचप्रमाणे उपमहापौर पदाची निवडसुद्धा बिनविरोध होणार असल्याचा विश्वास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी व्यक्त केला आहे.