जळगाव - आपले म्हणणे वेळोवेळी मांडल्यानंतरही भाजपकडून दखल घेतली जात नसल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पक्षांतराचे संकेत दिले आहेत. पक्षांतर करण्याबाबत एकनाथ खडसे हे सध्या समर्थकांचा कौल जाणून घेत आहेत. खडसे सध्या आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघात हा आढावा घेत आहेत. दरम्यान, भाजपकडून सातत्याने अन्याय होत असल्याने पक्षांतर करावेच, असा आग्रह समर्थकांकडून खडसेंना होत आहे.
हेही वाचा... पालिका महालक्ष्मी येथे बांधणार केबल दोरखंडांचा भव्य पूल, 'इतका' होणार खर्च
गेली 40 ते 42 वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही भाजपसाठी जिवाचे रान केले. तरी आपल्याला सापत्न वागणूक मिळत असल्याच्या भावनेने खडसे भाजपवर नाराज आहेत. अलिकडच्या काळात तर त्यांची नाराजी अधिकच वाढलेली दिसत आहे. त्यामुळे ते भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहेत. भाजप सोडण्यापूर्वी समर्थकांचा कौल काय आहे? हे जाणून घेण्यासाठी खडसे आता मतदारसंघात बैठका घेत आहेत. जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघ हा खडसेंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी खडसेंना मानणारा वर्ग मोठा आहे. पक्षांतराच्या मुद्द्यावर याच ठिकाणी समर्थकांचे म्हणणे खडसे जाणून घेत आहेत.
हेही वाचा... 'तरुणांनो, मोदी-शाह यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले.. भारताची विभागणी करुन द्वेषामागे लपण्याचा प्रयत्न'
भाजपकडून दखल घेतली जात नसल्याने खडसेंनी आता त्वरित निर्णय घ्यावा. आपण जो निर्णय घ्याल त्याला सर्वांचा पाठिंबा असेल, अशी ग्वाही समर्थकांकडून खडसे यांना मिळत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे खडसे भाजपशी फारकत घेतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा.... धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक