जळगाव - भाजपाच्या आज होत असलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला माजी मंत्री एकनाथ खडसे हे जळगावातून ऑनलाइन उपस्थित आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे पक्षावर नाराज असल्याने ते बैठकीला उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे. या बैठकीत काय विषय चर्चिले जातात, खडसे काय मुद्दे मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक दिवसानंतर एकनाथ खडसे आज दुपारी जळगावात त्यांच्या घरी आले. त्यांच्या राहत्या घरून त्यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. या बैठकीत प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित आहेत. विविध विषयांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
एकनाथ खडसे अनेक दिवसांपासून आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेतून पक्षावर नाराज आहेत. त्यांनी जाहीर कार्यक्रमातून नाराजी व्यक्त केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या भाजपाच्या बैठकीत ते उपस्थित असल्याने बैठकीला महत्त्व आले आहे. खडसे अनेक दिवसानंतर जळगावात आल्याने त्यांच्या समर्थकांनी भेटीसाठी गर्दी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा आहे. त्यामुळे खडसे बैठकीनंतर माध्यमांशी काय बोलतात, याची उत्सुकता आहे.
हेही वाचा - बाजारपेठ आठवडाभर सुरू ठेवण्याची परवानगी द्या; व्यापारी महामंडळाची प्रशासनाकडे मागणी