जळगाव - गेली 40-42 वर्ष मी भाजपसाठी काम करत आहे. पक्षवाढीसाठी निरपेक्षपणे काम केले. त्यामुळे साहजिकच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळावी, अशी अपेक्षा होती. परंतु, पक्षाने संधी दिली नाही. याची खंत आहे. ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. 'मोदी गो बॅक', असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कोणत्या दिशेने जात आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे, अशा शब्दांत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
भाजपने आज दुपारी विधानपरिषद निवडणुकीसाठी आपल्या चार उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. या विषयावर प्रतिक्रिया देताना खडसेंनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देत भाजपवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. ते मुक्ताईनगरात आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. खडसेंना पुन्हा एकदा डावलून भाजपने त्यांच्या राजकीय पुनर्वसनाला खो दिल्याने खडसे समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली चाळीस, बेचाळीस वर्ष मी एकनिष्ठपणे भारतीय जनता पार्टीचे काम करत आहे. या काळात अनेक चढउतार आम्ही पाहिले आहेत. भाजप कठीण प्रसंगात जात असताना आम्ही प्रतिकूल परिस्थितीत पक्ष वाढीसाठी काम केले आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करत असताना यावेळी मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो. मला अपेक्षा होती की पक्षाकडून संधी दिली जाईल. पण दुर्दैवाने संधी मिळू शकली नाही. पक्षाने यावेळी तर नव्या लोकांना संधी दिली. आमची अपेक्षा होती की पक्षाने किमान जे एकनिष्ठ राहिले आहेत, ज्यांनी पक्ष वाढीसाठी योगदान दिले आहे, अशा लोकांना संधी दिली असती तर मला अधिक आनंद झाला असता. मात्र, पक्षाने ज्यांनी भाजपला शिव्या घातल्या. 'मोदी गो बॅक', असा ज्यांचा नारा होता, अशा राष्ट्रवादीतून आलेल्या लोकांना भाजपने उमेदवारी दिली. त्यामुळे भाजप कोणत्या दिशेने जात आहे, याचे चिंतन करण्याची गरज आहे, असे खडसे यावेळी म्हणाले.
खडसे समर्थक प्रचंड नाराज -
भाजपने पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांना डावलल्याने खडसे समर्थक प्रचंड नाराज झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत तिकीट देऊन खडसे यांचे राजकीय पुनर्वसन होईल, अशी खडसे समर्थकांना अपेक्षा होती. परंतु, ती पुन्हा एकदा फोल ठरली आहे.