जळगाव Maratha Reservation : जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत मनोगत व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधलाय. तसंच आरक्षण मिळू न देण्यामागे कोण आहे हे सर्वांना माहीत असल्याचंही ते म्हणाले.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे : यावेळी बोलत असताना एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. ते म्हणाले की, गिरीश महाजन संकटमोचक आहेत. मात्र यावेळी जर ते मराठा आरक्षणासाठी सुरू असलेलं जरांगे पाटलांचं उपोषण सोडविण्यासाठी गेले असते, तर त्यांना लोकांनी मारलं असतं. तसंच मंत्री गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाचा रोष आहे, असंही खडसे यावेळी म्हणाले.
दोन महिन्यात सरकार आरक्षण देऊ शकणार नाही : पुढं ते म्हणाले की, वकील गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांचाच माणूस आहे, आणि त्यांचे हे पितळ आता उघड पडल्यामुळं मराठा समाजामध्ये रोष आहे. दरम्यान, दोन महिन्यात सरकार हे आरक्षण देऊ शकणार नाही, असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला.
सरकारच्या हलगर्जीमुळं हे घडलं : दरम्यान, आजची राजकीय स्थिती वादळी झाली आहे. राज्यात सरकार विरुद्ध वातावरण निर्माण झालंय. जनता सरकारच्या विरुद्ध आहे. मनोज जरांगे-पाटलांचं उपोषण सुरू झालं, तेव्हा सरकारनं ४० दिवसांचा अवधी मागून घेतला. मात्र, या दिवसांत सरकारनं बैठक घेतली नाही. आश्वासन पाळलं गेलं नाही. त्यामुळं मराठा समाजाचा उद्रेक रस्त्यावर झाला. सरकारच्या हलगर्जीमुळं हे घडलं, असंही ते म्हणाले.
हेही वाचा -