जळगाव - माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रुनुकसानीचे खटले दाखल केले आहेत. परंतु, दमानिया यांच्याकडे सबळ पुरावे नसल्याने त्या गेल्या 3 वर्षांपासून अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दमानियांवर केला आहे.
एकनाथ खडसे आज (रविवारी) जळगावात त्यांच्या 'मुक्ताई' निवासस्थानी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देऊ - गुलाबराव पाटील
खडसे पुढे म्हणाले, 3 वर्षांपूर्वी अंजली दमानिया यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. दमानियांच्या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आमचे म्हणणे होते. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील विविध 27 ठिकाणी यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले होते. दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रुनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे या दाव्यांमध्ये म्हटले आहे.
जळगाव न्यायालयात देखील भाजप कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी देखील ऍड. व्ही. एच. पाटील यांच्या वतीने दमानिया यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी 23 जानेवारीला होणार आहे. 3 वर्षांपासून विविध न्यायालयात सुनावण्या सुरू आहेत. परंतु, दमानिया पुरावे सादर करू शकलेल्या नाहीत. प्रत्येक सुनावणीला पुढची तारीख मागतात. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करतात. त्या पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्यानेच अब्रुनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप यावेळी खडसेंनी केला.
हेही वाचा - जळगावातील कांदा व्यापाऱ्याची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास अटक
दरम्यान, अंजली दमानिया यांच्याव्यतिरिक्त अन्य दुसऱ्या विषयावर बोलण्यास खडसेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला. 2 दिवसांपूर्वी भाजप जिल्हाध्यक्ष निवडीसाठी आयोजित बैठकीत झालेली शाईफेक आणि हाणामारीच्या विषयावरही त्यांनी बोलणे टाळले.