जळगाव - राज्यभरात भाजपाचे कार्यकर्ते नाराज आहेत. म्हणूनच ते राजीनामे देत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे सातत्याने भाजपाला लक्ष्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकनाथ खडसे आज सकाळी जळगावात त्यांच्या मुक्ताई निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पत्रकारांनी खडसेंना अहमदनगर जिल्ह्यातील भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिल्याबाबत विचारणा केली. संपूर्ण महाराष्ट्रात भाजपाच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत, असे खडसे म्हणाले.
विधानपरिषदेबाबत विचारणा केली असता म्हणाले 'जय श्रीराम' -
खडसेंना विधानपरिषद उमेदवारांच्या नावांबाबत विचारणा केली. मात्र, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसेंऐवजी त्यांच्या कन्या तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा अॅड. रोहिणी खडसे यांच्या नावाची चर्चा आहे. अॅड. खडसे या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या जळगाव शाखेच्या अध्यक्षा असल्याने कला व साहित्य क्षेत्रातून त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खडसेंनी फक्त 'जय श्रीराम' एवढीच प्रतिक्रिया दिली.
प्रशासनावर खडसेंची वाढती कमांड -
एकनाथ खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे हे राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी राज्याच्या सत्ताधारी पक्षात प्रवेश केल्याने त्यांचे प्रस्थ वाढले आहे. सध्या प्रशासनावर खडसेंच्या वाढत्या कमांडची चर्चा आहे. या आठवड्यात महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, एलसीबीतून नुकतेच बाहेर पडलेले पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांनी खडसेंची भेट घेतल्याने प्रशासकीय वर्तुळ ढवळून निघाले आहे. याची चर्चा सुरू असतानाच आज पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे आणि महानगरपालिकेचे आरोग्याधिकारी विकास पाटील यांनीही खडसेंची भेट घेतली. खडसेंनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत काही मिनिटे बंददाराआड चर्चा केली. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती समजू शकली नाही.
श्रीरामपूर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी दिले राजीनामे -
अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील 257 बुथ प्रमुख आणि 44 शक्ती केंद्र प्रमुखांनी पत्रकार परिषदेत काळे झेंडे दाखवत व काळ्या फिती लावून आपल्या पदाचे राजीनामे दिले. भाजपाचे जिल्हाअध्यक्ष राजेंद्र गोंदकर हे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून मनमानी कारभार करतात. याविरोधात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपले राजीनामे पाठवले होते.