जळगाव - मला भाजपच्या निर्णय प्रक्रियेसह कोअर ग्रुपमधून काढून टाकण्यात आले आहे. काही व्यक्तींकडून सातत्याने माझ्यावर अन्याय आणि अत्याचार करत अपमानीत केले जात आहे. हाच प्रकार जर यापुढेही सुरू राहिला, तर मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज जळगावात दिली. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नाराजी दूर न झाल्यानेच खडसेंनी पक्ष सोडण्याचे संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपची उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जळगावात पार पडली. या बैठकीनंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खडसेंनी नेहमीप्रमाणे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत भाजप पक्ष नेतृत्त्वाला लक्ष्य केले. आज मात्र खडसेंनी प्रथमच निर्णायक भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळ खळबळ निर्माण झाली आहे.
खडसे पुढे म्हणाले, मी पक्ष सोडणार नाही, हे मी गेल्या 25 वर्षांत वेळोवेळी सांगितले आहे. पक्ष सोडण्याचा विचार माझ्या मनात देखील नाही. जी व्यक्ती 40 ते 42 वर्षे पक्ष वाढीसाठी तसेच पक्ष संघटन मजबुतीसाठी झटली आहे. प्रतिकूल परिस्थितीत देखील पक्ष संघटन उभे केले, त्याच्या मनात पक्षाविषयी चुकीचा विचार येऊच शकत नाही. मात्र, पक्षातील काही लोकांकडून माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. आज उत्तर महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक असताना मला फक्त जळगाव जिल्ह्याच्या आढाव्यासाठी बोलावण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमांना देखील बोलावले जात नाही. अशा रितीने मला अपमानीत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मी माझ्या राज्यभरातल्या समर्थकांना पुढे काय भूमिका घ्यायची? याबाबत विचारणा करणार आहे. घरी बसायचे की पक्षाचे काम करायचे? याबाबतचा निर्णय मी समर्थकांच्या सांगण्यानुसार घेणार असल्याचे सांगत खडसेंनी पक्ष सोडण्याचे अप्रत्यक्षपणे संकेतच दिल्याची चर्चा राजयकीय वर्तुळात रंगली आहे.
शेवटी मी पण माणूसच आहे -
काही व्यक्तींकडून मला सतत अपमानित केले जात आहे. हे कुठपर्यंत सहन करायचे. माझी नोंदच घेतली जात नसेल, तर मला कुठेतरी विचार करावा लागेल. शेवटी मी पण माणूसच आहे. मी काही देव नाही. मलाही भावना आहेत. मी जो काही निर्णय घेईल तो पक्षाशी बोलूनच घेईल. वारंवार अपमानित केले जात असेल, तर मला वेगळा विचार करावाच लागेल, असे सांगत खडसेंनी भाजप पक्ष नेतृत्त्वाला निर्वाणीचा इशारा दिला.
चंद्रकांत पाटलांसोबत 2 तास बंद दाराआड चर्चा-
दरम्यान, पक्ष संघटनेचा आढावा घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यात एका खोलीत तब्बल 2 तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी खडसेंनी चंद्रकांत पाटलांना पक्षांतर्गत कुरघोड्या करणाऱ्यांचे सर्व पुरावे दिले. त्यात संबंधितांचे फोन, कॉल रेकॉर्डिंग, मेसेजे, काही सीडीज यांचा समावेश असल्याची माहिती खुद्द खडसेंनी चर्चेनंतर पत्रकारांना दिली. या साऱ्या बाबींची दखल पक्षश्रेष्ठी घेतील. हा पक्षांतर्गत शिस्तीचा भाग असल्याने तुम्ही या प्रकाराबाबत माध्यमांजवळ वाच्यता करू नका, असेही चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला सांगितल्याचे खडसे म्हणाले.
चुका करणाऱ्यांवर कारवाई करू- चंद्रकांत पाटील
एकनाथ खडसे पक्षावर नाराज नाहीत. मात्र, त्यांची मुलगी रोहिणी खडसेंच्या पराभवामुळे ते काहींवर निश्चित नाराज आहेत. त्यांनी त्याबाबतचे म्हणणे आपल्याकडे मांडले आहे. त्यांचे म्हणणे मी शांतपणे समजून घेतले आहे. ही बाब पक्षश्रेष्ठींपुढे मांडली जाणार असून चुका करणाऱ्यांवर कारवाई करू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिला. बैठकितील सविस्तर मुद्यांबाबत बोलण्यास त्यांनी नकार देत काढता पाय घेतला.