जळगाव- जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानाच्या वतीने 20 मार्च रोजी येणारी एकादशीची वारी रद्द करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मंदिर संस्थानाच्या विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा- कोरोनाचा फटका... तब्बल ३.८ कोटी भारतीयांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता
कोथळी येथील श्री संत मुक्ताबाई संस्थानात दरमहा येणारी एकादशीची वारी येत्या 20 मार्चला येणार आहे. या वारीसाठी जिल्ह्यासह महाराष्ट्रभरातून हजारोंच्या संख्येने भाविक कोथळीत येत असतात. मात्र, सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र सुरू आहे. त्याच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारने राज्यभरातील देवस्थाने, तीर्थक्षेत्रांवर होणारी गर्दी नियंत्रित करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत मुक्ताई संस्थानाने 20 मार्च रोजी येणारी एकादशीची वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
संस्थानाचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील यांनी बुधवारी या निर्णयासंदर्भातील पत्र जाहीर केले आहे. 20 मार्चला होणारी एकादशीची वारी रद्द करण्यात असल्याने भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये, असे आवाहन अॅड. पाटील यांनी संस्थानाच्या वतीने केले आहे.