जळगाव - अलीकडच्या काळात केंद्र सरकारकडून सक्तवसुली संचालनालय, म्हणजेच ईडीचा राजकीय उद्देशाने गैरवापर केला जात असल्याचे दिसून येते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना ईडीची सातत्याने नोटीस येत असताना भाजपच्या एकाही नेत्याला ईडीची नोटीस आल्याचे दिसत नाही. म्हणजेच ईडी हे राजकीय हत्यार झाले आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
हेही वाचा - नव्या रोहित्राच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे स्वतःला खड्ड्यात गाडून आंदोलन
आमदार रोहित पवार आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात पाचोरा येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. रोहित पवार पुढे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांना ईडीने चौकशीची नोटीस बजावली. त्या नोटीसला ते उत्तर देत आहेत. ईडीच्या बाबतीत बोलायचे झाले, तर केंद्र सरकारकडून राजकीय उद्देशाने ईडीचा वापर केला जात आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना चौकशीच्या नोटीस बजावल्या जात असताना भाजपच्या एकही नेत्याला ईडीची नोटीस आल्याचे दिसत नाही. आज तुम्ही एखाद्या रिक्षावाला किंवा पानपट्टीवाल्याला ईडीविषयी विचारले, तर ईडी हे राजकीय हत्यार झाले आहे, अशी प्रतिक्रिया येईल, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - जळगाव: सोन्यासह चांदीच्या भावात चढ-उतार; अमेरिकेच्या निवडणुकीचा परिणाम