जळगाव: सुदैवाने यामुळे कोणतीही हानी झाल्याची अद्याप माहिती नाही. जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप नेहमीच होत असतात. मात्र शुक्रवारी सकाळी खराखुरा भूकंप झाला आहे. नाशिक शहरापासून २७८ किलोमीटर अंतरावर म्हणजेच भुसावळ, सावदा परिसरात भारतीय प्रमाण वेळ सकाळी १०.३५ वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. नाशिक केंद्राच्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल तीव्रता नोंदवण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केले आवाहन: जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भुकंपाचे धक्के बसल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहेत. दरम्यान, भूकंपामुळे कुठे नुकसान किंवा हानी झाल्याचे अद्याप समोर आलेले नाही. तसेच हतनूर धरणाला काहीही धोका नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज सकाळी 10.35 वा. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन अमन मित्तल, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव यांनी केले आहेत. नागरिकांनी देखील इमारत हलल्याचे सांगितले.
8 जानेवारीला हिंगोलीत भूकंपाचे धक्के: कळमनुरी व औंढा नागनात तालुक्यातीलन अनेक गावांमध्ये 8 जानेवारीला पहाटे साडेचारच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. याची तीव्रता 3.6 स्केल रिश्टर एवढी भूमापक केंद्रावर नोंद झाली होती. जवळपास 40 ते 50 गावांमध्ये हे धक्के जाणवले होते. अचानक पहाटे - पहाटे साखर झोपेमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 3.6 स्केल रिश्टर तीव्रतेचा भूकंप होता. भूगर्भातील आवाजाने ग्रामस्थ घाबरले होते. प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत होते.
वारंवार येणाऱ्या आवाजांमुळे ग्रामस्थ हैराण : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, आमदरी, कंजारा पूर, वसई, जामगव्हाण, जलाल धाबा, काकड धाबा, तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी कळमनुरी तालुक्यातील बोथी दांडेगाव, सिंदगी, बोल्डा, असोला आदी गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. वसमत कळमनुरी औंढा नागनाथ या तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून जमिनीतून गुड आवाज येण्याचे सत्र सुरू होते. या भागात अनेक संशोधकांनी भेट देऊन जमिनीची पाहणी केली होती. मात्र भूगर्भातील सूक्ष्म हालचालीमुळे हे आवाज येत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात होते. मात्र वारंवार येत असलेल्या आवाजामुळे या भागातील ग्रामस्थ चांगलेच हैराण झालेले होते.