जळगाव - जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातील काही ठिकाणी आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यात कोठेही सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. दरम्यान, या प्रकारसंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आज सायंकाळी साडेसात ते पावणेआठ वाजेच्या सुमारास रावेर, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यातील काही गावांमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. परिसरात कोणताही मोठा आवाज न होता हा प्रकार घडल्याने नागरिकांनी हे भूकंपाचे धक्के असल्याचा दावा केला आहे. या प्रकारानंतर वेगवेगळ्या गावातील नागरिकांनी एकमेकांना फोनवरून आपल्याकडे भूकंपाचे धक्के बसल्याचा प्रकार घडल्याची माहिती दिली.
रावेरातील काही नागरिकांनी तहसीलदारांना या प्रकाराची माहिती देऊन घटनेची सत्यता पडताळून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तहसीलदार देवगुणे यांनी आपण स्वतः जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेत असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रावेर, मुक्ताईनगर आणि यावल तालुक्यात भूजल पातळी खोलवर गेली आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळल्याने कदाचित भूकंपाचे धक्के जाणवले असावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.