जळगाव - शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटारांच्या योजनेमुळे खोदलेले रस्ते, शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वर्षभरात शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून, प्रदूषण दुपटीने वाढले आहे.
शहरातील कोणत्याही रस्त्याच्या कडेला दोन-चार तासांसाठी वाहन उभे केले, तरी त्यावर धुळीचा अक्षरश: थर साचलेला असतो. कमी-अधिक प्रमाणात शहरातील सर्वच रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. तीन वर्षांपासून रेंगाळलेले अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम आणि त्यात वर्षभरापासून सुरू झालेल्या भुयारी गटारांच्या कामाने भर टाकत संपूर्ण शहरात रस्ते नावाचा घटकच अस्तित्वात ठेवलेला नाही.
या कामांसाठी रस्ते खोदलेले असताना, त्यांची योग्य व तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण अशी डागडुजीही झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे मोठे साम्राज्य पसरल्याचे दिसते. सोशल मीडियावर रस्ते, त्यातील खड्डे व त्यामुळे उडणाऱ्या धुळीबाबत शहराची स्थिती वर्णन करणारे ‘उपहासात्मक’ मेसेजेस सध्या जोरात आहेत. त्यातूनच सोशल मीडियावर जळगावचे नामकरण ‘धुळगाव’ करण्यात आले आहे.
‘रपेट’ मारली, तरी किलोभर मळ अंगावर
शहरातील धुळीची अवस्था अशी आहे, की शहरातील कोणत्याही भागातून काही वेळ पायी फिरलो अथवा, वाहनावर ‘रपेट’ मारली, तरी किलोभर मळ अंगावर जमा होईल, असा अनुभव येतोय. यात काहीशी अतिशयोक्ती असली, तरी दिवसभरात बाहेर फिरल्यानंतर आपला चेहरा, केस आणि कपड्यांची अवस्था बघितली तरी किती भयावह स्थिती आहे, याची कल्पना येते.
महापालिकेला बजावली नोटीस
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत महापालिकेला नोटीस बजावल्यानंतरही प्रशासन ढिम्म असून, ही अमृत योजनेची कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत योजनेंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम सुरू आहे. वर्षभरापासून त्यात भर पडून भुयारी गटारांचे काम सुरू झाले असून, या दोन्ही कामांमुळे शहरातील रस्त्यांची वाट लागून धुळीचे प्रदूषण वाढले आहे.