जळगाव - आपल्या आक्रमक शैलीमुळे ओळखले जाणारे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपाला लक्ष्य करताना खळबळजनक विधान केले आहे. 'भाजपा-शिवसेना युतीच्या असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेला संपवण्याचा भाजपाकडून जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. आपल्याच पाठींब्यावर आलेल्या सत्तेचा दुरुपयोग करून गावागावात शिवसेना संपवण्यासाठी प्रयत्न झाले. सत्तेत आपले दुय्यम स्थान होते. आपली अवस्था खूप वाईट होती. जणू काही आपण गुलाम होतो', असे धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना शनिवारी खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी राऊत यांनी युती सरकारच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.
संजय राऊत यांच्या या विधानामुळे भाजपा आणि शिवसेनेतील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर शिवसेना-भाजपा एकत्र येणार असल्याचे बोलले जात असतानाच राऊत यांच्या वक्तव्यामुळे भाजपा-सेनेच्या संबंधात पुन्हा मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे. यावर आता भाजपाकडून काय प्रतिक्रिया येतात? हे पाहणे महत्त्वाचे असेल.
आता मोकळा श्वास घेतोय -
मेळाव्यात मार्गदर्शन करताना संजय राऊत यांनी चांगलीच फटकेबाजी केली. कोरोनामुळे गेले दीड वर्ष आपण सर्वजण कोंडलेले होतो. मात्र, आता मोकळा श्वास घेत आहोत. या दीड वर्षांच्या काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले आहे. अशा प्रकारे तीन तिघाडा होऊन आपण सत्तेत येऊ, आपला मुख्यमंत्री होईल, हे आपल्या स्वप्नातही नव्हते. कारण त्यावेळी 'मी पुन्हा येईन' ही गर्जना सुरू होती. त्या गर्जनेने सर्वांच्याच डोक्यात तिटकारा होता. 5 वर्षे आपला कोंडमारा झाला होता. त्यातून डोक्यात तिडीक निर्माण झाली होती. त्यामुळे तुम्ही पुन्हा तर आम्ही का नाही? अशी सर्वांची भावना होती. आता आपले स्वतःच काहीतरी हवे, असे वाटत होते. त्यातून हे सारे घडले. बाळासाहेबांची पुण्याई फार मोठी आहे अजून... हा महाराष्ट्र त्यांच्याच पुण्याईवर चालतो, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
स्त्री आणि राजकारणाचे भाग्य कुणीही सांगू शकत नाही -
राजकारणाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, राजकारण हे पाण्यासारखं चंचल असते. स्त्री आणि राजकारणाचे भाग्य कुणीही सांगू शकत नाही. राजकारणात काहीही घडू शकते. अजित पवारांचा पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता, ते आज आपल्या बाजूला मांडीला मांडी लावून बसतात. ज्यांनी सर्वात आधी 'मी पुन्हा येईन' बरोबर शपथ घेतली होती. ते आज आपल्या सरकारचे सर्वात मोठे प्रवक्ते आहेत. फडणवीस सरकारच्या काळात शिवसेनेला संपवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न झाले. पण आज शिवसेनेचे भाग्य बदलत आहे. राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्री करतोय, हे अभिमानाने आपण सांगतो. ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची, शिवसैनिकांची भावना आहे. याच भावनेतून महाविकास आघाडी सरकार निर्माण झाले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - प्रशांत किशोर-शरद पवारांची भेट ही राजकीय उलाथापालथ करणारी घटना नाही - संजय राऊत