जळगाव - कोरोनाच्या लढ्यात राज्य सरकारला मदत करण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था, राजकीय पक्ष तसेच दानशूर व्यक्ती स्वतःहून पुढे येत आहेत. जळगावातील माध्यमिक शिक्षक पतपेढीदेखील कोरोनाच्या लढ्यात राज्य सरकारला पाठबळ मिळावे म्हणून पुढे सरसावली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता मदत निधीमध्ये माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने 11 लाख 11 हजार 111 रुपयांची मदत करण्यात आली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
प्रत्येकाने आपल्या आर्थिक कुवतीनुसार कोरोनाग्रस्तांसाठी जमेल तशी मदत करून कोरोनाच्या लढ्यात खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या वतीने राज्यातील कोरोनाग्रस्तांसाठी 11 लाख 11 हजार 111 रुपये इतक्या रकमेची आर्थिक मदत करण्यात आली आहे. पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरुड यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश दिला. माध्यमिक शिक्षक पतपेढीने मदत केल्याने पालकमंत्री या नात्याने गुलाबराव पाटील यांनी आभार मानले. दानशूर व्यक्ती व संस्थांनी आपल्या परीने शक्य ती मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करावी, असेही आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले आहे.
यांची होती उपस्थिती -
मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदतीचा धनादेश देतेवेळी माध्यमिक शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष शालिग्राम भिरूड, मानद सचिव मनोहर सूर्यवंशी, उपाध्यक्ष बी. टी. सपकाळे, संचालक हेमंत चौधरी, नंदकुमार पाटील, संजय निकम, अधीक्षक आर. एन. महाजन आदी उपस्थित होते.