जळगाव - कोविड रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे एक 17 वर्षीय तरुण मृत्यूच्या दाढेतून परत आला आहे. या तरुणाच्या पोटात अपेंडिक्स (आंत्रपुच्छ) फुटून पू झाला होता. त्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, हे संकट ओढवलेले असताना त्याला कोरोनाची लागण झालेली होती. कोरोनाग्रस्त असतानाही कोविड रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर दीड तास गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. त्यानंतर कोरोनाचे उपचार केल्याने तो पूर्णपणे बरा होऊन बुधवारी (2 सप्टें.) आपल्या घरी परतला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया झाल्याची जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे.
जिल्ह्यातील एका 17 वर्षीय तरुणाच्या पोटातील अपेंडिक्स अचानकपणे फुटली होती. अपेंडिक्स फुटून त्याच्या पोटात पू झाला होता. त्यामुळे त्याच्या पोटात खूप दुखत होते. म्हणून तरुणाच्या नातेवाईकांनी त्याला जळगाव शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी नेले होते. परंतु कोरोना संसर्गाची साथ सुरू असल्याने तरुणाची कोरोना तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानंतर तरुणाची कोरोना चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली होती. म्हणून तरुणाला जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी तरुणाच्या पोटातील अपेंडिक्स फुटून पू झाल्याचे निदान झाले होते. अशा परिस्थितीत तरुणावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा विषय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या कानावर घातला. हा डॉ. रामानंद यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच तरुणावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शल्यचिकित्सा शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. मारुती पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्राध्यापक डॉ. हेमंत चौधरी, डॉ. उमेश जाधव, भूलतज्ञ डॉ. भारुडे, डॉ. काजल यांनी नर्सिंग स्टाफच्या मदतीने तरुणावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया केली. तरुणाच्या पोटातील फुटलेली अपेंडिक्स, पू तसेच इतर घाण स्वच्छ करण्यात आली. त्यानंतर त्याला कोविड उपचारासाठी दाखल करण्यात आले. योग्य उपचार मिळाल्याने तो कोरोना तसेच पोटाच्या त्रासातून पूर्णपणे बरा झाला. या तरुणाला आज सायंकाळी कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यावेळी तरुणासह त्याच्या कुटुंबीयांनी कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी तसेच नर्सिंग स्टाफचे आभार व्यक्त केले. तरुणाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दरम्यान, तरुणावर वेळीच शस्त्रक्रिया झाल्यानंतर योग्य ते उपचार करण्यात आले. तो पूर्णपणे बरा झाला आहे. कोविड रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नामुळे तरुणाला जीवनदान मिळाले. या सेवेचे समाधान असल्याची प्रतिक्रिया अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी 'ई- टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - 'गेल्या 10-12 वर्षात पुढं आलेले नेते आम्हाला अक्कल शिकवायला लागलेत'