ETV Bharat / state

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय 'खल'; नेत्यांच्या गाठी-भेटीत वाढ - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पारडे जड राहील. भाजपाही जोर लावून विरोधी पक्षांच्या अडचणी वाढवू शकतो. दुसरीकडे, काँग्रेसने ताकद नसताना स्वबळाचा नारा देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

जळगाव जिल्हा बँक
जळगाव जिल्हा बँक
author img

By

Published : Aug 26, 2021, 12:37 AM IST

Updated : Aug 26, 2021, 7:10 AM IST

जळगाव - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 21 संचालकांच्या निवडीसाठी लवकरच सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. पण, तत्पूर्वीच या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वपक्षीय 'खल' सुरू झाला आहे. सहकारात पक्षीय राजकारण नसते, असा समज असला तरी जळगाव जिल्हा बँकेत मात्र, पक्षीय राजकारणाचे प्रतिबिंब दिसून येते. सध्या ही निवडणूक सर्वपक्षीय वाटाघाटी करून बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न फसले तर जिल्ह्यातील बदललेली राजकीय परिस्थिती पाहता यावेळी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे पारडे जड राहील. भाजपाही जोर लावून विरोधी पक्षांच्या अडचणी वाढवू शकतो. दुसरीकडे, काँग्रेसने ताकद नसताना स्वबळाचा नारा देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या वेळेचे पक्षीय बलाबल पाहिले तर या वेळेसही काँग्रेसच्या वाट्याला निराशा येईल, अशी स्थिती आहे.

जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय 'खल'

पुढच्या आठवड्यात मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय पॅनलसाठी चाचपणी सुरू आहे. यासंदर्भात व्यूहरचना आखण्यासाठी पुढील आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षनिहाय जागा वाटपाचे सूत्र ठरवून, ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी गेल्या आठवड्यात माजीमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. भाजप नेते गिरीश महाजन यांनाही या बैठकीत आणण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटलांनी पुढाकार घेतला आहे. या बैठकीत सर्वपक्षीय पॅनलबाबत नेत्यांचे एकमत झाले नाही तर मात्र, निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात 29 किंवा 30 तारखेला जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत जर काही निर्णय झाला नाही तर सर्व पक्ष लंगोट बांधून तयार आहेत. शिवसेनेची भूमिका देखील लवकरच जाहीर केली जाईल, असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

असे होते गेल्या वेळचे चित्र

गेल्या वेळी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात 21 पैकी सर्वाधिक 10 संचालक हे भाजपचे होते. त्या खालोखाल 6 संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे तर 4 संचालक हे शिवसेनेचे होते. 1 संचालक सर्वपक्षीय मानले जाणारे होते. त्यावेळी माजीमंत्री एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते. त्यांनी पुढाकार घेऊन सर्वपक्षीय एकत्र आणत निवडणूक बिनविरोध केली होती. आता खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले आहेत. त्यामुळे साहजिकच राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड राहणार आहे. खडसे भाजपच्या अडचणी वाढवण्यासाठी ताकद लावतील, यात शंका नाही. दुसरीकडे, राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र असलेली शिवसेनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत गेली तर यावेळी निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची शक्यता आहे.

भाजपकडून स्वबळाची चाचपणी

सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न फसले तर ऐनवेळी अडचण होऊ नये, म्हणून भाजपने स्वबळाची चाचपणी केली आहे. विकास सोसायटी मतदार संघाच्या 15 जागांसह इतर मतदारसंघातील 6 जागांबाबत भाजपने इच्छुकांच्या नावांची यादी तयार ठेवली आहे. त्यात जळगाव- आमदार सुरेश भोळे, धरणगाव- चर्चेअंती निर्णय, अमळनेर- माजी आमदार शिरीष चौधरी, पारोळा- चर्चेअंती निर्णय, एरंडोल- विजय महाजन, भडगाव- प्रशांत पवार, चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण, जामनेर- आमदार गिरीश महाजन किंवा अन्य कार्यकर्त्याला संधी, बोदवड- चर्चेअंती निर्णय, मुक्ताईनगर- अतुल पाटील किंवा नयना कांडेलकर, भुसावळ- आमदार संजय सावकारे, चोपडा- चर्चेअंती निर्णय, यावल- विनोद पाटील किंवा प्रशांत चौधरी, रावेर- नंदू महाजन, पाचोरा- पंडित शिंदे, (इतर मतदारसंघाच्या 6 जागांसाठी) ओबीसी- नारायण चौधरी, एसटी- प्रभाकर सोनवणे, इतर मतदारसंघ- खासदार उन्मेष पाटील, एनटी- राजेंद्र राठोड, महिला राखीव 2 जागांसाठी- माजी आमदार स्मिता वाघ अशी यादी भाजपने तयार ठेवली आहे. यात क्वचितच फेरबदल होण्याची शक्यता आहे.

असे असू शकते सर्वपक्षीय पॅनल

जिल्हा बँकेच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर टाकली असता वाटाघाटी करूनच संचालक मंडळ स्थापन झाल्याचे पाहायला मिळते. आताही सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पॅनेलमध्ये सध्या चर्चेत असलेली नावे अशी आहेत- जळगाव- आमदार सुरेश भोळे, धरणगाव- संजय पवार, अमळनेर- आमदार अनिल पाटील, पारोळा- आमदार चिमणराव पाटील, एरंडोल- अमोल पाटील, भडगाव- नानासाहेब देशमुख किंवा प्रताप पाटील, चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण किंवा माजी आमदार राजीव देशमुख, जामनेर- आमदार गिरीश महाजन, बोदवड- ऍड. रवींद्र पाटील, मुक्ताईनगर- माजीमंत्री एकनाथ खडसे, भुसावळ- आमदार संजय सावकारे, चोपडा- डॉ. सुरेश पाटील, यावल- आर. जी. पाटील किंवा विनोद पाटील, रावेर- नंदू महाजन, पाचोरा- आमदार किशोर पाटील, (इतर मतदारसंघाच्या 6 जागांसाठी) ओबीसी- माजीमंत्री डॉ. सतीश पाटील, इतर मतदारसंघ- माजीमंत्री गुलाबराव देवकर, एसटी- माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, एनटी- मेहताबसिंग नाईक, महिला राखीव 2 जागांसाठी- ऍड. रोहिणी खडसे किंवा संगीता भंगाळे.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावेदार?

गेल्यावेळी सर्वपक्षीय पॅनलसाठी एकनाथ खडसे यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांच्या मर्जीतील संचालकाची अध्यक्षपदी वर्णी लागली होती. यावेळेस एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. शिवाय जिल्हा बँकेत राष्ट्रवादीची ताकद पाहता अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचा दावा मजबूत राहणार आहे. सर्वपक्षीय पॅनलचे प्रयत्न फसले तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांपैकी एकाच्या वाटेला अध्यक्षपद जाईल, अशी शक्यता आहे.

काँग्रेसचा स्वबळाचा नारा, सर्वपक्षीयचे प्रयत्न फसणार?

एकीकडे जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय पॅनल उभे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुसरीकडे काँग्रेसने या निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा देऊन आव्हान उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जिल्ह्यात काँग्रेसला मानणारा वर्ग मोठा आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँकेत स्वतंत्र पॅनल देणार आहोत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हेही वाचा - राहुल गांधींना मालमत्तांचे रोखीकरण समजते का? निर्मला सीतारामन यांचा राहुल गांधींना खोचक टोला

Last Updated : Aug 26, 2021, 7:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.