जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आज (बुधवारी) ईडीने कारवाई केल्याची जोरदार चर्चा दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे. खडसेंचे फार्महाऊसही सील केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या चर्चेला कुठेही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. दरम्यान, खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी सायंकाळी या चर्चेचे खंडन केले. खडसे कुटुंबीयांवर आज ईडीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा मालमत्ता जप्त केलेली नाही. कामानिमित्त खडसे बाहेरगावी गेले आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे रोहिणी खडसेंनी स्पष्ट केले.
आज दुपारी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खडसेंवर ईडीची कारवाई झाल्याची चर्चा सुरू झाली होती. ईडीने त्यांना ताब्यात घेतले, बंगल्यावर जप्तीची नोटीस चिटकवली, अशा एक ना अनेक चर्चा सुरू होत्या. मात्र, त्याला अधिकृत दुजोरा नव्हता. खडसेंच्या निकटवर्तीयांनीही अशा स्वरूपाची कोणतीही कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट केले होते. अखेर खडसेंच्या कन्या अॅड. रोहिणी खडसेंनी माध्यमांच्या समोर येऊन अधिकृत खुलासा केला. खडसे कुटुंबीयांवर आज ईडीने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही किंवा मालमत्ता जप्त केलेली नाही. कामानिमित्त खडसे बाहेरगावी गेले आहेत, असे त्या म्हणाल्या. सोशल मीडियावर ज्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे आम्ही अचंबित आहोत. या सर्व अफवा असून, त्यावर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करताना रोहिणी खडसेंनी सांगितले की, जळगावात आल्यानंतर खडसे सर्वांशी संवाद साधतील.
एकनाथ खडसे सायंकाळी उशिरापर्यंत नॉट रिचेबल-
या विषयासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता खडसेंचा फोन सायंकाळी उशिरापर्यंत नॉट रिचेबल होता.
फार्महाऊस कुलूपबंद-
एकनाथ खडसे यांचे मुक्ताईनगर शहरापासून काही अंतरावर फार्महाऊस आहे. हे फार्महाऊस बुधवारी कुलूपबंद होते. त्यामुळे एकच चर्चा रंगली होती. दरम्यान, खडसे फार्महाऊसवर नसताना ते सुरक्षेच्या कारणास्तव बंद असते. खडसे बाहेरगावी असल्याने फार्महाऊस बंद आहे, असेही अॅड. रोहिणी खडसे यांनी सांगितले.