जळगाव - जिल्हा रुग्णालयात दाखल एका कोरोना संशयित रुग्णाचा ३० मार्चला मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना तपासणी अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे, जिल्हा प्रशासनसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आतापर्यंत ७९ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने ही दिलासा देणारी बाब आहे. कोरोना तपासणीचे २ अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तर २ रुग्णांचे नमुने रिजेक्ट करण्यात आले आहेत. दरम्यान, २ रुग्ण नव्याने दाखल झाल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली आहे.
शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले दोन रुग्ण आढळून आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. महापालिका प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. संपूर्ण शहरात निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग तसेच हायपोक्लोराईडची फवारणी केली जात आहे.