जळगाव - बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहाराचे प्रकरण राज्यभर गाजत आहे. अशातच भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथेही माजीमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावे असलेल्या 'एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थे'च्या गैरव्यवहाराचे प्रकरण समोर आले आहे. या पतसंस्थेच्या दामदुप्पट मुदत ठेव योजनेत पैसे गुंतवलेल्या दोन ठेवीदारांनी, आपल्याला ठेवीची मुदत पूर्ण होऊन एक रुपयाही मिळाला नसल्याचा आरोप शनिवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, ही पतसंस्था एकनाथ खडसे यांच्या नावाने असली तरी खडसे यांचा तिच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते पतसंस्थेच्या संचालक मंडळातही नसल्याची माहिती समोर आली आहे.
वरणगाव येथील एकनाथराव खडसे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या दामदुप्पट मुदत ठेव योजनेत, भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील यादव जगन्नाथ पाटील आणि वरणगाव येथील प्रकाश रघुनाथ चौधरी यांनी आपले पैसे गुंतवले होते. मात्र, मुदत ठेव योजनेचा कालावधी पूर्ण होऊनही त्यांना दामदुप्पट तर नाही; पण मुद्दल रक्कमही परत मिळाली नाही. त्यांनी आपले हक्काचे पैसे मिळावेत म्हणून पतसंस्थेच्या पायऱ्या झिजवल्या पण, उपयोग झाला नाही. शेवटी आता त्यांनी जळगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे त्यांच्याकडे मांडले. गुप्ता यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा विषय शनिवारी प्रसारमाध्यमांसमोर मांडला. बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहार प्रकरणात ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी यादव पाटील व प्रकाश चौधरी यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी गुप्ता यांनी केली. दरम्यान, पाटील व चौधरी यांच्यासह शेकडो ठेवीदारांचे पैसे पटसंस्थेकडे अडकले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
यादव पाटील यांनी दामदुप्पट मुदत ठेव योजनेअंतर्गत या पतसंस्थेत १७ मे २००६ रोजी २७ हजार, १७ ऑगस्ट २००६ रोजी १५ हजार तसेच १० ऑक्टोबर २००६ मध्ये ५० हजार रुपये ठेवले होते. त्याचप्रमाणे, प्रकाश चौधरी यांनीही या पतसंस्थेत ६ सप्टेंबर २००३ मध्ये १० हजार रुपये ठेवले होते. परंतु, दोघांना मुदत ठेवीचा कालावधी पूर्ण होऊनही पैसे मिळाले नाहीत. या दोघांच्या एकनाथराव खडसे पतसंस्थेसह धनवर्धिनी, महात्मा फुले अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटी तसेच लोककल्याण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतही ठेवी आहेत. मात्र, या सर्व पतसंस्थांमध्ये गेल्यानंतर कुठलीही रक्कम मिळाली नाही. त्यांचा लढा आजही सुरूच आहे. यादव पाटील व प्रकाश चौधरी यांनी २०१० मध्ये एकनाथ खडसे यांची भेट घेतली होती. त्यावेळी खडसेंनी या पतसंस्थेशी माझा कुठल्याची प्रकारचा संबंध नसल्याचे सांगितले होते, असेही दोघांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पतसंस्थेला माझे नाव म्हणजे मी भ्रष्टाचार केला असे होत नाही - एकनाथ खडसे
याबाबत बोलताना एकनाथ खडसे यांनी आपली बाजू मांडली आहे. वरणगाव येथील एकनाथराव खडसे पतसंस्थेशी माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. पतसंस्थेला माझे नाव आहे म्हणजे मी भ्रष्टाचार केला असे होत नाही. या पतसंस्थेच्या कारभाराविषयी माहिती घेतली असता, पतसंस्थेकडे ठेवीदारांचे ६० लाख रुपये घेणे आहे. तर पतसंस्थेचे कर्जदारांकडे १ कोटी रुपये अडकले आहेत. कर्ज वसुली झाल्यानंतर ठेवीदारांची रक्कम परत केली जाईल, अशी माहिती पतसंस्थेने दिल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.