जळगाव - अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या हरणाचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी जिल्ह्यातील यावल तालुक्यातील वाघळूद फाट्याजवळ घडली. दरम्यान, जखमी झालेल्या हरणाला उपचारासाठी वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले. परंतु, वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने हरणाचा मृत्यू झाला, असा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
हेही वाचा - जळगावातील दोन सराईत गुन्हेगार जिल्ह्यातून हद्दपार; दोन वर्षांच्या काळासाठी कारवाई
यावल तालुक्यातील भुसावळ - यावल रस्त्यावर असलेल्या वाघळूद फाट्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक हरीण गंभीर जखमी झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात हे हरीण विव्हळत पडले होते. त्याच्या पायाला जखम झालेली होती. याच वेळी यावल येथील मनसेचे कार्यकर्ते विक्की बाविस्कर हे घटनास्थळी आले. त्यांनी मिनिडोर चालक प्रशांत बारी यांच्या मदतीने जखमी हरणाला उपचारासाठी यावल येथील वनविभागाच्या कार्यालयात आणले. परंतु, वेळीच उपचार न मिळाल्याने हरणाचा मृत्यू झाला.
हलगर्जीपणा केल्याचा आरोप
दरम्यान, यावल वनविभागाच्या कार्यालयात जखमी हरणावर दीड तास उपचार झाले नाहीत. त्यामुळे, त्याचा मृत्यू झाला. वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर, विक्की बाविस्कर यांनी केला. या आरोपासंदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मिळाले नाही.
हेही वाचा - जळगावात सावत्र बापाकडून मुलीवर अत्याचार; संशयित आरोपीला अटक