जळगाव - जिल्ह्यात १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे ७ तालुक्यांमध्ये ३ हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका गहू पिकाला बसला असून, सर्वच ठिकाणी ३३ टक्क्यांच्यावर नुकसान झाले आहे.
हेही वाचा - जळगाव : जामनेरात चौघांनी केला वृद्धेचा खून; दोन जण अटकेत
गुरुवारी रात्री जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यात रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, चोपडा, एरंडोल, अमळनेर, पारोळा या तालुक्यांमधील १४१ गावांमध्ये १३ हजार ४१८ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अवकाळी पाऊस व गारपिटीचा सर्वाधिक फटका गव्हाच्या पिकाला बसला आहे. तब्बल २ हजार ८ हेक्टरवरील गव्हाचे नुकसान झाले. त्या खालोखाल मक्याचे ७१६ हेक्टर, ज्वारीचे ४०२ हेक्टर, हरभऱ्याचे २८४ हेक्टर इतर पिके ४६ हेक्टर, बाजरीचे ३१ हेक्टर, कांद्याचे २५ हेक्टर, तर केळीचे एक हेक्टर, असे एकूण ३ हजार ५९३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
पंचनामे करण्याचे आदेश
जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्हा कृषी अधीक्षक यांनी पंचनाम्याला सुरुवात केली आहे. यात प्राथमिक पाहणी केली असता, जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून शासनाने दिलेल्या आदेशानुसार कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहे. पंचनाम्याला सुरुवात झाली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर यांनी सांगितले.
तालुकानिहाय नुकसान आकडेवारी
रावेर ३२, मुक्ताईनगर ४७, भडगाव ६८, चोपडा १२६, एरंडोल ६५०, अमळनेर २५३०, पारोळा १४०, एकूण ३५९३.
हेही वाचा - चिंताजनक! जळगावात 24 तासांत आढळले 321 नवे रुग्ण