जळगाव - धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पांझरा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील ब्राह्मणे गावाजवळ पांझरा नदीवर सिंचनाच्या उद्देशाने बांधलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वाहून गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या उन्हाळ्यात या भागातील गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
अमळनेर तालुक्यातील गावांनी गेली चार वर्षे दुष्काळाची झळ सोसली आहे. यावर्षी मात्र, तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखवला आहे. सिंचनाच्या बाबतीत मोठा अनुशेष असलेल्या अमळनेर तालुक्यातील काही गावांना पुन्हा एकदा उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे. कारण पांझरा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे ब्राम्हणे गावाजवळील पांझरा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला आहे.
धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत सुमारे ५८ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. या पुरामुळे ब्राम्हणे येथील कोल्हापूर बंधाऱ्याचे १० दरवाजे तुटले. या बंधाऱ्यात पाणी अडविणे आता अशक्य आहे. बंधाऱ्याच्या दरवाज्यांमध्ये असलेल्या पाट्या पुराचे पाणी वाहण्यासाठी अडसर ठरल्याने हा बंधारा फुटला. याला सिंचन विभागाचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.