जळगाव - भुसावळमधील पाच जणांच्या सामूहिक हत्याकांडानंतर पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त लावला आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून जमावबंदी देखील लागू केली आहे. ज्या ठिकाणी हे हत्याकांड झाले, त्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
हेही वाचा - भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला; पाच जणांचा मृत्यू
या घटनेनंतर भुसावळ शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळात पुन्हा एकदा गँगवारने डोकेवर काढले आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळात सामूहिक हत्याकांड घडल्याने खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - भुसावळमधील सामूहिक हत्याकांडाला राजकीय पूर्ववैमनस्याची किनार
या घटनेत मृत झालेले रवींद्र खरात, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यासह पाचही जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावात जिल्हा सामान्य रुग्णालयात आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच खरात यांच्या घरी नातेवाईक तसेच मित्र परिवाराने गर्दी केली आहे. एकूणच या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.