जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यातील कोरपावली गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. कोरपावली येथील एका ८१ वर्षीय कोरोना संशयित वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर वृद्धाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृताच्या मुलाने काळजीपूर्वक अंत्यसंस्कार न करता, वृद्धाचा मृतदेह घरी नेला. प्लास्टिकची पॅकिंग उघडून मृतदेहाला आंघोळ घातली. त्यानंतर कब्रस्तानमध्ये १०० पेक्षा अधिक लोकांची गर्दी जमवत दफनविधी केला. या घटनेच्या २ दिवसांनी मृत वृद्धाचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याप्रकरणी मृताच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरपावली गावात राहणाऱ्या एका ८१ वर्षीय वृद्धास श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना २७ जून रोजी कोरोनासाठी शासनाने अधिग्रहित केलेल्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे असल्याने कोरोना संशयित म्हणून त्यांच्या घशाचे नमुने घेण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या वृद्धाचा २९ जूनला मृत्यू झाला. मृत वृद्ध कोरोना संशयित असल्याने अंत्यविधीसाठी रुग्णालय प्रशासनाने त्यांचा मृतदेह नियमानुसार प्लास्टिकमध्ये पॅकिंग करून मुलाच्या ताब्यात दिला. तेव्हा मृताच्या मुलाला मृतदेह घरी नेऊन कुठलाही विधी न करता सरळ कब्रस्तानमध्ये घेऊन अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या होत्या.
मुलाचा अक्षम्य निष्काळजीपणा -
मृत वृद्धाच्या मुलासह नातेवाईकांनी मृतदेह नियमानुसार कब्रस्तानमध्ये न नेता घरी नेला. घरी गेल्यावर मृतदेहाला बांधलेले प्लास्टिक सोडून मृतास आंघोळ घालण्यात आली. त्यावेळी जवळचे नातेवाईक व इतर असे मिळून जवळपास १०० हून अधिक लोक अंत्यविधीसाठी जमलेले होते. त्यानंतर लॉकडाऊन व संचारबंदीचा नियम न पाळता वृद्धाचा दफनविधी करण्यात आला. दफनविधी झाल्यानंतर आता २ दिवसांनी या वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पोलीस पाटील सलीम तडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे यावल तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. तर, वृद्धाच्या अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांची माहिती काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.
प्रशासनाचाही हलगर्जीपणा -
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाचाही हलगर्जीपणाही समोर आला आहे. कोरोना संशयित व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह संबंधित नातेवाईकांच्या ताब्यात देणे, मृतदेहावर अंत्यसंस्कार करणे या सार्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. परंतु, तशी कोणतीही खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली नाही. यापूर्वी जिल्ह्यातील अमळनेर, भडगाव, जळगाव आणि भुसावळ शहरात असे प्रकार घडले आहेत. संबंधित शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला. तरीही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे उघड झाले आहे.