जळगाव - एकीकडे राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टीने हाहाकार माजवला. तर दुसरीकडे, उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे, हजारो हेक्टरवरील पिके धोक्यात आली असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर, धरणगाव, पारोळा या तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेला 'ईडी'ची नोटीस?, खडसेंच्या साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची मागितली माहिती
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. पण, अजूनही इथे पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे, पिकांनी माना टाकल्या आहेत. काही भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना चारा देखील मिळत नाहीये. आता पाऊस पडला, तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. पण, हातची गेलेली पिके पुन्हा येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे, सरकारने कागदी घोडे न नाचवता तातडीने मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अमळनेर तालुक्याला सर्वाधिक फटका -
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात सर्वात भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. अमळनेर तालुक्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ६७० मि.मी. आहे. चालू हंगामात जून महिन्यामध्ये ७६.६ मि.मी. व जुलै महिन्यामध्ये ९०.८ मि.मी. असे एकूण १६७.४ मि.मी. पर्जन्यमान फक्त तालुक्यात झालेले आहे. म्हणजेच वार्षिक सरासरीच्या तुलनेत २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झालेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे सुमारे ७० हजार हेक्टर ऐवढ्या पेरणीयोग्य क्षेत्रापैकी ४५ ते ४८ हजार हेक्टर क्षेत्रावर दुबार पेरणी करण्यात आली आहे. पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजावर पुन्हा तिसऱ्यांदा पेरणीचे संकट ओढवले आहे.
अमळनेर तालुक्यातील काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी तिबार पेरणी केली. पण, ती देखील वाया गेली आहे. चालू वर्षाचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला असून, बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. अमळनेर तालुक्यात २५ टक्क्यांपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे तात्काळ पंचनामे करून अमळनेर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. शासनाने शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २५ हजार रुपयांचे सरसकट सानुग्रह अनुदान जाहीर करावे, शेतीपंपाचे चालू वर्षाचे वीज बील माफ करण्यात यावे, गुरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात अशाही मागण्या शेतकरी करत आहेत. दरम्यान, अमळनेर तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार अनिल भाईदास पाटील यांनी राज्य शासनाकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सूचना करण्याची विनंती केल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने यंदाचा खरीप हंगाम वाया जाण्याची भीती आहे. पावसाचा खंड मोठा असल्याने जिल्ह्यात जुलै महिन्यात करण्यात आलेली दुबार पेरणी केलेली पिके देखील संकटात सापडली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ६० टक्के पाऊस झाला आहे. त्यात धरणगाव, अमळनेर व चोपडा या तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे, या तालुक्यांमधील खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे.
उडीद, मूग, सोयाबीनची वाढ खुंटली
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा खंड पडला आहे. पावसाअभावी सोयाबीन, उडीद, मुगाची वाढ पूर्णपणे खुंटली आहे. आगामी काही दिवस पाऊस झाला नाही तर उडीद व मूग पिकांचे उत्पन्न येणार नाही. बागायती कापसाची स्थिती चांगली असली तरी कोरडवाहू कापसालाही मोठा फटका बसला आहे. ज्वारी, बाजरी आणि मका पिकाची देखील हीच स्थिती आहे. आठवडाभरात चांगला पाऊस पडला नाही तर जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिके जळून जाण्याची भीती आहे.
हेही वाचा - जळगाव जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक अॅड. रवींद्र पाटलांचा राजीनामा