जळगाव - जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रकरणे निर्णयाविना प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या बैठकीला पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. त्यामुळे पालकमंत्र्यांनी पीक विम्याच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विमा कंपनीला 30 जूनचा अल्टीमेटम दिला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अरुण प्रकाश यांच्यासह विविध तालुक्यातील शेतकरी या बैठकीला उपस्थित होते.
हेही वाचा - ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून राणे कुटुंबीयांचे सांत्वन
नुकसान होऊन वर्ष उलटले, विम्याचा लाभ मात्र नाहीच -
बैठकीत खासदार रक्षा खडसेंनी विमा कंपनीच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या वर्षी पीक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप विम्याचा लाभ मिळालेला नाही. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या चक्रीवादळामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे झालेले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळायला हवी, अशी मागणी खासदार रक्षा खडसेंनी केली.
केळी बागांच्या नुकसानीकडे वेधले लक्ष -
विमा कंपनीकडून केळी नुकसानीचे पंचनामे करताना नुकसान कमी झाल्याचे दाखवण्यात येत आहे. पूर्णतः नुकसान झालेल्या केळी खोडांचेच नुकसान दाखवले जात आहे. मात्र, ज्या केळीच्या खोडांना पाऊस व वादळाचा फटका बसलेला आहे. मात्र, ते उभे आहे. अशा केळी खोडांपासून शेतकऱ्यांना कुठलाही फायदा होणार नसून ते सुद्धा शेतकरी काढून टाकणार आहेत. अशा नुकसानीची सुद्धा दखल घेण्याबाबत खासदार रक्षा खडसेंनी आढावा बैठकीत मुद्दा उपस्थित केला.
शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत लाभ द्या -
पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलेच धारेवर धरले. तांत्रिक बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत पीक विम्याचा लाभ द्या, असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, चालू खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप करावे, अशा सूचनाही त्यांनी बँकांच्या प्रतिनिधींना केल्या. पात्र शेतकऱ्याला पीक कर्ज मिळालेच पाहिजे. तो त्याचा अधिकार आहे. जर पात्र असूनही बँका पीज कर्ज देण्यास टाळाटाळ करत असतील तर माझ्याकडे तक्रार करा, असे आवाहन त्यांनी केले.
हेही वाचा - निलेश राणेंच्या वडिलांची हाऱ्या-नाऱ्याची गँग; मंत्री गुलाबराव पाटलांचा पलटवार