जळगाव - जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत एका गुन्हेगाराचा मृत्यू झाला. अमळनेर तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. रवींद्र अजबसिंग पाटील (वय ४८, रा. चांदणी कुऱ्हे, ता. अमळनेर) असे मृत आरोपीचे नाव आहे. दरम्यान, ११ एप्रिल रोजी अमळनेरातही अशीच घटना घडली होती. राकेश वसंत चव्हाण या गुन्हेगाराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला होता.
मृत रवींद्र पाटील याने २००० मध्ये गावातील एक महिला डॉक्टर आणि तिच्या आईचा खून केला होता. या गुन्ह्यात त्याने नाशिक व पैठण कारागृहातून शिक्षा भोगली होती. २ वर्षांपूर्वी शिक्षा भोगून तो कारागृहातून सुटला होता. त्याचे कुटुंब सध्या सुरत येथे राहते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांपूर्वीच तो आपल्या मूळगावी चांदणी कुऱ्हे येथे परतला होता. सोमवारी दुपारी गावात त्याचे काही लोकांशी भांडण झाले.
भांडणाचे रुपांतर मारामारीत झाले. जमावाने केलेल्या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. पोलीस पाटील ज्ञानेश्वर प्रताप पाटील यांनी त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताळे यांनी उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यानंतर चांदणी कुऱ्हे गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. आरोपीचा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गावाला भेट देत पाहणी केली. यानंतर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.