जळगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याने सर्वच क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. लग्न सोहळे देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी करून आयोजित करण्यावर निर्बंध घालण्यात आले असून, लग्नासाठी वधू तसेच वर पक्षांकडील फक्त 50 जणांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे इव्हेंट व्यावसायिक म्हणजेच, वाजंत्री, मंगल कार्यालये, फुलवाले, मंडप, केटरर्स आणि इतर पूरक व्यावसायिक पुरते हवालदिल झाले आहेत. अनेक व्यावसायिकांकडे अॅडव्हान्स बुकिंग रद्द होत आहेत. अशा परिस्थितीत मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग ऐन लग्नसराईच्या काळात झाला होता. त्यामुळे गेल्या वर्षीही लग्नसराईत इव्हेंट व्यावसायिकांना फटका सहन करावा लागला होता. त्यानंतर यावर्षी लग्नसराईच्या प्रारंभी नियंत्रणात दिसणारी परिस्थिती अचानक बदलली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे आता देखील गेल्या वर्षीप्रमाणेच कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, इव्हेंट व्यावसायिकांवर संकट आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने इव्हेंट व्यावसायिकांच्या अपेक्षांवरच पाणी फिरले आहे.
मंडप डेकोरेटर्सचा व्यवसाय करणारे संजय अग्रवाल म्हणाले की, गेल्या वर्षी कोरोनामुळे आमचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प होता. तरी आम्ही जेमतेम तग धरून राहिलो. यावर्षी परिस्थितीत बदल होईल, असे वाटत होते. पण आता पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे व्यवसाय ठप्प होण्याची वेळ आली आहे. राज्य शासनाने 50 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळे उरकण्याचे सांगितल्याने सर्वाधिक फटका आमच्या व्यवसायाला बसला आहे. अनेक जण बुकिंग रद्द करत आहेत. त्यामुळे कामगारांचा पगार, कर्जाचे हप्ते व इतर देणी चुकवायची कशी, हा प्रश्न आहे. अशीच परिस्थिती राहिली तर आमच्यावर आत्महत्येची वेळ येईल, असे अग्रवाल यांनी सांगितले.
लायटिंग डेकोरेटरचे व्यावसायिक जयेश खंदार यांनी सांगितले की, 50 लोकांमध्ये लग्न सोहळे करण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे मंगल कार्यालयात किंवा थाटामाटात लग्न करण्यास कुणीही तयार नाही. अशा परिस्थितीत आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. आम्हाला गोदामाचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार देणेही शक्य होत नाही. राज्य शासनाने आमच्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करून लोकांच्या उपस्थितीची मर्यादा वाढवून दिली पाहिजे, असे खंदार म्हणाले.
शहराचे अर्थकारणच कोलमडणार-
जळगाव शहरात सुमारे अडीचशे ते तीनशे मंडप डेकोरेटर्स, हजारांवर फुल विक्रेते व केटरर्स, शेकडो फोटोग्राफर व वाजंत्रीवाले आहेत. या साऱ्या व्यवसायांवर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. परंतु, कोरोनामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थकारण कोलमडणार आहे. लहान-मोठ्या व्यावसायिकांवर कोरोनावर मंदीचे संकट आले असून, ही परिस्थिती कधी निवळते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.