जळगाव - जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे यावर्षी खरीप हंगामात कापसाचा पेरा 20 ते 25 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसाचा वाढीव पेरा हा पूर्वहंगामी कापसाचा असणार आहे. सद्यस्थितीत विहिरी, कूपनलिकांना पाणी उपलब्ध असल्याने अनेक शेतकरी पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीवर भर देतील, अशी अपेक्षा कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी व्यक्त केली.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात 5 ते साडेपाच लाख हेक्टरवर पूर्वहंगामी तसेच हंगामी कापसाची लागवड होते. गेल्यावर्षी 5 लाख 10 हजार हेक्टरवर खरीप कापसाची पेरणी झाली होती. यंदा त्यात 25 ते 30 हजार हेक्टरची वाढ अपेक्षीत आहे. सध्या देशभरात 'कोरोना'मुळे लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच बंद आहे. शासनाने कृषी संबंधित सर्व व्यवसाय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी खरिपासाठी शेतीची मशागत करत आहेत. जळगाव जिल्ह्यात दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्वहंगामी कापसाची लागवड सुरू होते. आता पूर्वहंगामी कापसाच्या लागवडीसाठी शेतकरी लगबगीत असल्याचे पाहायला मिळत आहे.
बियाणांचे वाटप 25 मे नंतरच-
शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी केली असली तरी शेतकऱ्यांना बी. टी. बियाणांचे वाटप 25 मे नंतरच होणार आहे. यंदा 25 लाख 53 हजार बी. टी. बियाणांच्या पाकिटांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्याचवेळी शेतकऱ्यांना खतेही मिळतील. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने अजूनही अनेक विहिरींना पाणी आहे. यामुळे शेतकरी पूर्वहंगामी कापूस लागवडीसाठी तयार आहेत. असे असले तरी आता जर कापूस पेरला तर गुलाबी बोंडअळीचा धोका आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी 1 जूननंतरच करावी, असे आवाहन कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी केले आहे.
कृषी आयुक्त 21 ला घेणार आढावा-
यावर्षीच्या कृषी हंगामाबाबत जिल्ह्याचा आढावा, बियाणे व खतांच्या मागणीबाबत 21 एप्रिलला पुणे येथील कृषी आयुक्त व्ही.सी.द्वारे माहिती घेणार आहे. खरीप हंगामाबाबत कर्ज, बियाणे, खते आदींचा आढावा ते घेतील, असेही अनिल भोकरे यांनी सांगितले.