जळगाव - अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापूस पिकाला बसला आहे. जळगाव जिल्ह्यात यावर्षी सुमारे साडेपाच लाख हेक्टरवर कोरडवाहू तसेच बागायती कापसाची लागवड करण्यात आली होती. त्यापैकी चार ते सव्वाचार लाख हेक्टरवरील कापसाचे पीक वाया गेले आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयांचेदेखील उत्पन्न मिळणार नाही, अशी स्थिती आहे. 'अतिवृष्टीमुळे कापसाचे पीक वाया गेले आहे. आता डोक्यावरचं कर्ज कसं फेडायचं? राज्य सरकारने मदत केली नाही, तर आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही', अशा उद्विग्नतेत कापूस उत्पादक शेतकरी आहेत.
एकूण लागवड क्षेत्रापैकी ७० ते ७५ टक्के कापूस वाया -
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. यावर्षी जिल्ह्यात ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सुमारे ६० ते ६५ हजार हेक्टर क्षेत्रावरील कोरडवाहू कापसाचे, तर ३ ते साडेतीन लाख हेक्टरवरील बागायती कापसाचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात दरवर्षी खरीप हंगामात साधारणपणे ५ ते साडेपाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड होते. यावर्षी कापसाच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी ७० ते ७५ टक्के क्षेत्रावरील कापूस वाया गेला असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अजूनही शेतांमध्ये साचले आहे पाणी -
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बागायती कापसाचे उत्पादन निघायला सुरुवात होते. मात्र, यावर्षी नेमका याच काळात मुसळधार पाऊस झाल्याने बागायती कापूस शेतातच भिजला आहे. काही शेतांमध्ये कापसाची बोंडे सडली आहेत. अजूनही शेतांमध्ये पाणी साचलेले आहे. भिजलेला कापूस वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी शेतातील ओला कापूस वेचून घरी आणून ठेवला आहे. हा कापूस उन्हात वाळवण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत. दुसरीकडे, कापसासोबत मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन ही पिके देखील अतिवृष्टीमुळे हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरीप हंगाम निराशाजनक ठरला आहे.
भूषण पाटलांना सतावतेय कर्जाची चिंता -
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. त्याची दाहकता जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही भारत'ने अमळनेर तालुक्यातील मंगरूळ गावातील युवा शेतकरी भूषण अरूण पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यात शेतकऱ्यांवरील संकटाचे विदारक स्वरूप समोर आले. भूषण पाटील यांच्याकडे १० एकर शेती आहे. ते दरवर्षी कापसाचे पीक घेतात. यावर्षी त्यांनी ८ एकरात कापूस लावला होता. जमिनीची सुरुवातीची नांगरणी करणे, रोटा मारणे, सऱ्या पाडणे, त्यानंतर बियाणे, लागवड मजुरी, फवारणी असा मिळून आतापर्यंत त्यांना सुमारे दीड ते पावणे दोन लाख रुपये खर्च आला आहे. मात्र, अतिवृष्टीमुळे संपूर्ण पीक जळून गेल्याने त्यांना एक रुपयांचेही उत्पन्न मिळणार नाही आहे. त्यामुळे रब्बी हंगामाच्या तयारीसाठी मशागत आणि बी-बियाणे खरेदीचा खर्च करायचा कसा, खरीप हंगामासाठी विकास सोसायटीकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत ते सापडले आहेत.
एकरी मिळत होते ४ ते ५ क्विंटलचे उत्पन्न -
'ईटीव्ही भारत'शी बोलताना भूषण पाटील म्हणाले की, दरवर्षी आम्ही शेतात कापूस लागवड करतो. अमळनेर तालुका तसा जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त भाग. त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षाही कमी पडतो. म्हणून आम्ही बँकेकडून कर्ज घेऊन ठिबक सिंचनाची व्यवस्था केली आहे. त्यात काही एकर क्षेत्रात ठिबक सिंचनावर तर उर्वरित क्षेत्रात पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड केली जाते. सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाला, तर आम्हाला कापसाचे एकरी ४ ते ५ क्विंटल उत्पादन मिळत होते. यावर्षी मात्र, अतिवृष्टीमुळे संपूर्ण कापूस वाया गेल्याने एकरी ४० ते ५० किलोदेखील उत्पादन निघणार नाही, अशी बिकट स्थिती आहे. अतिवृष्टीमुळे जमीन अक्षरशः खरडून निघाली आहे. काही ठिकाणी तर ठिबक सिंचन संचही वाहून गेला आहे, असे भूषण पाटील म्हणाले.
राज्य सरकारने पीक कर्ज माफ करावे -
अतिवृष्टीमुळे फक्त माझ्यावर हे संकट ओढवलेले नाही, तर माझ्यासारख्या हजारो शेतकऱ्यांची हीच स्थिती आहे. खरीप हंगामातील पीक पूर्ण हातातून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. तो रब्बी हंगामाचा विचारही करू शकत नाही. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट आणि कोणत्याही निकषांविना पीक कर्जमाफी द्यावी, रब्बी हंगामाच्या तयारीसाठी काहीतरी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणीदेखील त्यांनी केली.
नुकसानीचे पंचनामे सुरू, अंतिम आकडेवारीची प्रतीक्षा -
'अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान मुख्य नगदी पीक असलेल्या कापसाच्या पिकाचे झाले आहे. त्या खालोखाल नुकसान मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. दरम्यान, कृषी व महसूल विभागाच्या वतीने जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्याची अंतिम आकडेवारी अद्याप हाती आलेली नाही. अनेक ठिकाणी पंचनामे झालेले नसल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - येवला तालुक्यातील पिके पाण्यातच; सरसकट पंचनामे करण्याची मागणी