जळगाव - महानगरपालिका प्रशासनाने शहराच्या स्वच्छतेसाठी वॉटरग्रेस कंपनीकडून एस.के. कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट दिले आहे. यामध्ये 4 महिन्यात 1 कोटी 20 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. एस. के. कॉन्ट्रॅक्टरला दिलेले कंत्राट नियमबाह्य असून, त्यात कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्तींचे पालन झालेले नाही. महानगरपालिकेत शासकीय निधीची लूटमार सुरू आहे. या भ्रष्टाचारात ठेकेदार, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह प्रशासनातील अधिकारी सहभागी आहेत, असा आरोप विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे.
या संदर्भात शिवसेनेचे महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांसह प्रशासनातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. पत्रकार परिषदेला शिवसेनेचे माजी महापौर विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, नगरसेवक नितीन बरडे आदी उपस्थित होते.
जळगाव शहराच्या स्वच्छतेसाठी महानगरपालिका प्रशासनाने नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला 5 वर्षांच्या काळासाठी 75 कोटी रुपयांचे कंत्राट दिले. मात्र, वॉटरग्रेसचे काम असमाधानकारक असल्याच्या कारणावरून हेच कंत्राट 6 मार्चपासून एस. के. कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था होती. मुळात एस. के. कॉन्ट्रॅक्टरला महापालिकेच्या बांधकाम विभागात केवळ 9 मजूर पुरवण्याचे कंत्राट दिलेले होते. मात्र, नवीन कंत्राटानुसार त्याने रस्ते व गटारींच्या स्वच्छतेसाठी 400 कामगार आणि 250 कामगार वाहन चालक, असे एकूण 650 कामगार पुरवणे आवश्यक आहे. 6 मार्चपासून एस. के. कॉन्ट्रॅक्टरला कंत्राटापोटी 2 कोटी 40 लाख रुपये देण्यात आले आहेत. या कामाच्या बिलांची फाईल तपासली असता त्यात 1 कोटी 20 लाखांचा भ्रष्टाचार आढळला, असा आरोप सुनील महाजन यांनी केला.
कंत्राटात सत्ताधाऱ्यांची पार्टनरशीप -
शासनाच्या नियमानुसार 3 लाखांहून अधिक रकमेच्या कामांची निविदा काढावी लागते. मात्र, या कंत्राटात कुठलीही निविदा प्रक्रिया राबवली गेली नाही. वॉटरग्रेसला अनेक अटी व शर्तींसह कंत्राट दिले होते, त्या अटी व शर्ती एस. के. कॉन्ट्रॅक्टरला लावलेल्या नाहीत. वॉटरग्रेसला कंत्राट देताना 5 वर्षासाठी 75 कोटी रुपये खर्च होणार होते. त्यातही वॉटरग्रेसला मजूर, वाहनांचे डिझेल व मेंटेनन्स या गोष्टी स्वतः पहाव्या लागणार होत्या. मात्र, एस. के. कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या कंत्राटात वाहनांचे डिझेल व मेंटेनन्स महापालिका करत आहे. त्यामुळे महापालिकेला 5 वर्षांत 85 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. या कंत्राटात सत्ताधाऱ्यांची पार्टनरशीप असल्याचा आरोप महाजन यांनी केला. यात 10 कोटींचा जास्त खर्च होणार आहे. हा पैसा जळगावकरांच्या खिशातून जाणार आहे, असेही महाजन म्हणाले.
भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप -
वॉटरग्रेसला कंत्राट देताना 2 कोटी रुपयांची सॉल्वन्सी(आर्थिक हमी) घेण्यात आली होती. मात्र, एस. के. कॉन्ट्रॅक्टरकडून साधी बँक गॅरंटीही घेतली नाही. या सर्व प्रकरणा मागे कोण आहे, याचाही खुलासा सत्ताधाऱ्यांनी केला पाहिजे, असे सांगत सुनील महाजन यांनी भाजप नगरसेवकांवर गंभीर आरोप केले. महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या हजेरीत बोगसपणा आहे, हजेरी मस्टरवर कामगारांची नावेही पूर्ण नाहीत. भाजप नगरसेवकांच्या नातेवाईकांची अनेक नावे हजेरी मस्टरवर आहेत. हे कंत्रात विना निविदा चालवावे म्हणून आयुक्तांवर दबाव आहे. वॉटरग्रेसला ठेका देताना भाजपच्या नगरसेवकांना प्रति महिना 10 हजार रुपये मिळतील असे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात आले होते. पण नगरसेवकांनी ऐकले नाही म्हणून स्थानिक नेतृत्वाने 15 हजार देण्याचे मान्य केले. तेही न मिळाल्याने भाजप नगरसेवक नाराज आहेत. एस. के. कॉन्ट्रॅक्टरला कंत्राट देताना 20 हजार देण्याचे आमिष दाखवल्याचा आरोपही महाजन यांनी केला.
या भ्रष्टाचारासंदर्भातील सर्व कागदपत्रे घेऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ नगरविकास मंत्र्यांना भेटणार आहे. यात प्रशासनातील काही अधिकारी देखील सहभागी आहेत. याबाबत विरोधी पक्षनेता म्हणून मी स्वतः महापालिकेने केलेल्या नियमांचा भंग व कामगारांची पिळवणूक यासंदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार करणार आहे, असे महाजन म्हणाले.
भाजपकडून आरोपांचे खंडन -
दरम्यान, स्वच्छतेच्या कंत्राटासंदर्भात शिवसेनेकडून झालेल्या आरोपांचे भाजपने खंडन केले आहे. भाजपच्यावतीने स्वीकृत नगरसेवक व महापौरांचे पती कैलास सोनवणे यांनी खुलासा केला. शिवसेनेकडे काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. सुनील महाजन यांना महासभेत या विषयावर चर्चा करण्यासाठी अर्धा तास जास्तीचा वेळ दिला जाईल. त्यांनी आरोप सिद्ध करुन दाखवावेत, असे सांगत सोनवणे यांनी अधिक बोलणे टाळले.