जळगाव - रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या नोंदणीकृत हॉकर्सला हक्काची जागा देण्यासाठी महापालिकेने गोलाणीतील अनधिकृत विक्रेत्यांना हुसकावून लावले. त्यानंतर प्रशासनाने शनिवारी ३७० ओटे ताब्यात घेतले. येत्या आठवडाभरात साफसफाई, रंगरंगोटी, फवारणी करून व ओट्यांना क्रमांक देण्याचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती उपायुक्त संतोष वाहुळे यांनी दिली.
जळगावातील बीओटी तत्वावर उभारण्यात आलेल्या गोलाणी मार्केटमध्ये सुरूवातीपासून भाजीपाला व फळ विक्रेत्यांसाठी ओट्यांची निर्मिती करण्यात आली आहे. सुरुवातीचे काही महिने उलटल्यानंतर काही मोजक्या विक्रेत्यांकडूनच ओट्यांचा वापर सुरू आहे. तर मोठ्या प्रमाणात विक्रेते रस्त्यावर दुकाने लावून व्यवसाय करत आहेत. दरम्यान, रस्त्यावर व्यवसाय करण्यास बंदी असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थिती अनेक दिवसांपासून व्यवसाय बंद असलेल्या सुभाष चौक व बळीराम पेठेतील नोंदणीकृत हॉकर्सला गोलाणीत जागा देण्यात येणार आहे. त्यासाठी शनिवारी उपायुक्त वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाच्या पथकाने अनधिकृत ओटेधारकांना हुसकावून लावत ४२८ पैकी ३७० ओटे ताब्यात घेतले.
लॉटरी पद्धतीने नोंदणीकृत हॉकर्सला देणार जागा
पुढच्या आठवड्यात मार्केटच्या तळमजल्यावरील ओट्यांची दुरुस्ती, त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. साफसफाई, रंगरंगोटीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक ओट्याला क्रमांक देऊन लॉटरी पद्धतीने नोंदणीकृत हॉकर्सला जागा दिली जाणार असल्याची माहितीही उपायुक्त वाहुळे यांनी दिली आहे.