जळगाव - कोरोनाची लस अंतिम टप्प्यात आली आहे. साधारणपणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या लसीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनुषंगाने, जळगाव जिल्ह्यात लसीच्या वितरणाच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. जिल्ह्यातील १६ हजार ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाणार आहे. एका कर्मचाऱ्याला दोन डोस, यानुसार ३२ हजार डोस जिल्ह्यासाठी लागणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
कोरोना लसीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या नियोजनाबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत म्हणाले, जिल्ह्यात आरोग्य केंद्र व ३७० आरोग्य उपकेंद्र अशा ठिकाणी एकाच दिवसात आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाची लस साठवणुकीसंदर्भातील मार्गदर्शक सूचना अजून केंद्र किंवा राज्य सरकारकडून स्पष्ट नाहीत. मात्र, पल्स पोलिओची लस ज्या पद्धतीने साठवली जाते, त्याच धर्तीवर कोरोनाची लस साठवली जाईल, असा प्राथमिक अंदाज आहे. लसीची साठवणूक करण्यासाठी शासकीय तसेच काही खासगी शितगृहांची मदत घेतली जाणार आहे. खासगी शितगृहांनी प्रशासनाला कमी मोबदल्यात साठवणुकीसाठी होकार दिल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. कोरोनाची लस साठवणुकीसाठी शितगृहांची आवश्यकता भासणार आहे. एका दिवसातच लस देण्याचे नियोजन आहे. मात्र, लस साठवून ठेवायची कशी, त्याचे तापमान किती असावे, याबाबत अजून स्पष्टता नसल्याने वेळेवर राज्य सरकार याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासगी यंत्रणेतील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही मिळेल लस-
जिल्ह्यातील १६ हजार ७८ आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राथमिक टप्प्यात कोरोनाची लस देण्यात येणार आहे. त्यात १३ हजार २४५ कर्मचारी हे शासकीय असून २ हजार ८३३ कर्मचारी हे खासगी यंत्रणेतील आहेत. खासगी यंत्रणेतील १० टक्के कर्मचाऱ्यांची माहिती प्रशासनाकडे येणे अद्यापही बाकी आहे. एका आरोग्य केंद्रावर एकाच वेळी १०० तर उपकेंद्रावर ५० आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.
आरोग्य केंद्रांवर सहाय्यकांची नियुक्ती होणार-
कोरोनाची लस देण्यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रावर नियोजन केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर सहाय्यकांची नेमणूक करण्यात येणार असून, यात साधारण १ हजार ५८ सहाय्यक असतील, असेही नियोजन करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र अशा केंद्रांवर हे सहाय्यक राहतील. परिस्थितीनुसार ही संख्याही बदलण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा-
कोरोनाच्या लसीबाबत शासकीय आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध झाली असून, त्यानुसार १६ हजार कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ही लस द्यायची आहे. त्यात आरोग्य केंद्रांचा विचार केल्यास एकाच दिवसात हे लसीकरणाचे काम होऊ शकते. यासाठी शीतगृहांचेही नियोजन करण्यात येत आहे. ही लस घ्यायची की नाही, हे ऐच्छिक राहते का, सक्ती असेल, याबाबत राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.