जळगाव - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजूर झालेल्या प्रयाेगशाळेच्या (लॅब) उभारणीच्या कामाला गती देण्यात येत आहे. निर्धारीत जागेच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. तसेच शासनाच्या हापकीन कंपनीतर्फे लॅबसाठी लागणाऱ्या मशिनरी खरेदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली.
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्राे बाॅयाेलाॅजी विभागाची इमारत काेराेना लॅबसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यासाेबतच सार्वजनिक बांधकाम विभागाला या इमारतीत लॅब उभारणीसाठी नूतनीकरणासाठी पत्र देण्यात आले हाेते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने नूूतनीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. नवीन प्रयाेगशाळा सुरू करण्यासाठी जागा निश्चित झाल्यानंतर लॅबसाठी लागणारी मशिनरी खरेदी करण्यासाठी शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी औषधी, साधन सामग्री व यंत्रसामग्री आदींची खरेदी ही शासनाचा उपक्रम असलेल्या हापकीन या कंपनीतर्फे करण्यात येते. त्यानुसार हापकीन मुंबईला जळगाव लॅबसाठी मशिनरी खरेदीबाबत मागणी महाविद्यालय प्रशासनाकडून नाेंदवण्यात आली आहे. त्यानुसार हापकीन प्रशासनाने खरेदीसाठी आदेश दिले असून येत्या ८ ते १० दिवसांत या मशिनरी प्राप्त हाेण्याची शक्यता आहेे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लॅब सुरू करण्यासाठी डाॅक्टर्स, ६ तंत्रज्ञ, १ डाटा एन्ट्री ऑपरेटर आदी मनुष्यबळ लागणार आहे. त्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान ही लॅब तीन शिफ्टमध्ये काम करून २४ तास चालणार आहे.
लॅबसाठी तंत्रज्ञांची व्यवस्था लवकरच करण्यात येणार
लॅबसाठी महाविद्यालयाकडे डाॅक्टर्स आहेत. तंत्रज्ञांची व्यवस्था करण्यात येणार आहे. मशिनरी खरेदीचे आदेश हापकीनने दिले असून ८-१० दिवसांत ही मशिनरी उपलब्ध हाेण्याची शक्यता आहे. त्यानुसार येत्या १५ दिवसांत लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ. भास्कर खैरे यांनी दिली.