जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.84 टक्क्यांवर आला आहे. सर्वात कमी पॉझिटिव्हिटी असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पॉझिटिव्हिटी रेट जळगाव दुसऱ्या स्थानी -
राज्यात मार्च महिन्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली होती. दररोज किमान एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक संख्येने कोरोनाबाधित रुग्ण समोर येत होते. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट वाढल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.89 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. गेल्या 15 दिवसांचा विचार करायचा झाला, तर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांनी घसरला असून, तो 3.83 टक्क्यांवर आला आहे. राज्यात सर्वात कमी पॉझिटिव्हिटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जळगाव जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी भंडारा जिल्हा असून भंडाऱ्याचा पॉझिटिव्हिटी रेट 3.44 टक्के इतका आहे.
आरोग्य विभागातर्फे अहवाल जाहीर -
आरोग्य विभागातर्फे बुधवारी 18 ते 24 मे या आठवडाभराच्या कालावधीतील पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी जाहीर करण्यात आली. जिल्हानिहाय जाहीर झालेल्या पॉझिटिव्हिटी रेटच्या अहवालात जळगावचा पॉझिटिव्हिटी दर 3.83 टक्के इतका आहे. पॉझिटिव्हिटीचा घसरता आलेख ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे.
महिनाभरापूर्वी होती युद्धजन्य परिस्थिती -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक असल्याने जिल्ह्यात महिनाभरापूर्वी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णांना बेड मिळत नव्हते. ऑक्सिजन, रेमडेसिवीर व टॉसिलीझुमॅब इंजेक्शनसाठी तर रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः धावाधाव करावी लागत होती. परंतु, आता ही स्थिती बदलली आहे. जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांमध्ये निम्म्याहून अधिक बेड्स रिकामे आहेत. जिल्ह्यातील 118 खासगी रुग्णालयांना कोविडच्या उपचाराची परवानगी दिली होती. त्यातील 25 ते 30 रुग्णालयांनी स्वतःहून कोविडचे उपचार थांबवत असल्याचे प्रशासनाला कळवले असून नॉन कोविडच्या उपचारासाठी परवानगी मागितली आहे. जिल्हा शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातदेखील निम्मे बेड रिक्त आहेत. ऑक्सिजन, औषधी यांचा तुटवडा नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने नियोजन सुरू -
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. तिसर्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका राहील, अशी शक्यता वर्तवली जात असल्याने जिल्ह्यासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्यात शासकीय आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ डॉक्टरांसह खासगी डॉक्टरांचासुद्धा समावेश आहे. बालरोगतज्ज्ञ, दंतरोग तज्ज्ञ, नाक-कान-घसा तज्ज्ञ यांचा प्राधान्याने टास्क फोर्समध्ये समावेश केला असल्याचेही डॉ. नागोराव चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - 'समाजात नवे प्रश्न तयार होत असतात, त्याचा आणि सरकारच्या अस्थिरतेचा काय संबंध?'