जळगाव - जिल्ह्याला कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसत आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये 22 आणि रविवारी सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये 45 नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 738 वर पोहचली आहे. रुग्ण वाढीचा वेग असाच सुरू राहिला तर तो हजाराचा टप्पा लवकरच गाठू शकतो.
जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालांची माहिती नुकतीच एकत्रितपणे जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात नव्याने 67 पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. शनिवारी रात्री प्राप्त 47 अहवालांमध्ये 22 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 24 रुग्णांचे निगेटिव्ह आलेत. एका रुग्णाचा पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 22 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जळगाव 12, यावल 3, जळगाव ग्रामीण 1, अमळनेर 2, एरंडोल 2, भुसावळ आणि सावदा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्याचप्रमाणे रविवारी सायंकाळी आलेल्या 114 अहवालांमध्ये 45 रुग्णांचे पॉझिटिव्ह तर 69 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. यातही 8 रुग्णांचे पुनर्तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या अहवालांमध्ये जळगाव 12, जळगाव ग्रामीण 2, भुसावळ 7, यावल 3, रावेर 1, धरणगाव 3, अमळनेर 5, पाचोरा 1, चोपडा 1 आणि जामनेर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे.
जळगावात एकाच कुटुंबातील 12 जण पॉझिटिव्ह -
जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या झपाट्याने वाढत आहे. जळगाव शहरात नवल कॉलनी परिसरात शेजारी-शेजारी राहत असलेल्या एकाच कुटुंबातील 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आधीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात हे नातेवाईक होते. यासोबतच आणखी एका भागात कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरातील रुग्णसंख्येने दीडशतक ओलांडले आहे.
शहरात नवनवीन भागांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत असल्याने संसर्गाचा धोका अधिकच वाढत असल्याचे चित्र आहे. नवल कॉलनीत दोन दिवसांपूर्वी एक रुग्ण आढळून आला होता. त्याच्या हायरिस्क व लो रिस्क अशा संपर्कातील शेजारील सर्व व्यक्तींना अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांचे अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्यानंतर यातील 12 जण बाधित आढळले आहेत. तसेच चार ते पाच जणांचे अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.
मृतांची संख्याही वाढतीच -
गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील मृतांची संख्या 77 वर पोहचली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत भुसावळात सर्वाधिक 23 तर अमळनेर 13 व जळगावात 11 जणांच्या मृत्यूची नोंद होती.
जिल्हा प्रशासनाला शनिवारी दिवसभरात तीन टप्प्यांत 270 संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 55 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर, 215 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आलेत. एकाच दिवशी तब्बल 55 एवढ्या मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण समोर येण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ होती. यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची 676 झाली होती. जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आता हा आकडा 738 वर पोहोचला आहे.