जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरशः कहर सुरू आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत आताची दुसरी लाट अतिशय वेगाने वाढत आहे. या लाटेत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जशी वाढतच चालली आहे, तशीच बळींची संख्याही दिवसेंदिवस वाढत असून, आरोग्य यंत्रणा हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. सप्टेंबर २०२० नंतर आता एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाचा कहर वाढला आहे. एप्रिल महिना अधिकच भयावह असून, गेल्या तीन आठवड्यांचा विचार केला तर जिल्ह्यात सुमारे सव्वा तीनशे रुग्णांचा बळी गेला आहे. यात वृद्धच नाही तर तरुणांचेही मृत्यू मोठ्या प्रमाणात होत आहेत.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. बाधितांची संख्या व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सद्यस्थिती अत्यंत भयावह असून, सप्टेंबरनंतर एप्रिल महिना अधिक भयावह ठरला आहे. एप्रिल महिन्याच्या तीन आठवड्यात म्हणजेच, गेल्या २० दिवसात जिल्ह्यातील ३२९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या कालावधीत २० हजारांहून अधिक नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. कोरोनाच्या विषाणूचा म्युटेंट पूर्वीच्या तुलनेत आता अधिकच शक्तिशाली झाल्याने तो झपाट्याने हातपाय पसरत आहे. संसर्गाची तीव्रता अधिक असल्याने मृत्यूचे प्रमाण देखील वाढल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सहा महिन्यानंतर एप्रिलमध्ये सर्वाधिक मृत्यू -कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबर २०२० या महिन्यात जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक ३७१ रुग्णांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर सहा महिन्यांनी म्हणजेच आता एप्रिल महिन्यात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल महिन्याच्या २० दिवसांमध्ये रुग्णसंख्या व मृत्यूचा उच्चांक नोंदविण्यात आला आहे. एप्रिल महिना अजून पूर्ण व्हायचा आहे, तोपर्यंत ३२९ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेतील हे सर्वाधिक मृत्यू आहेत. गंभीर बाब म्हणजे, गेल्या पाच दिवसात १०० पेक्षा अधिक बाधितांचे मृत्यू झाले आहेत. यात जळगाव शहरात सर्वाधिक ४६० मृत्यू नोंदविण्यात आले आहेत. ही संख्या जिल्ह्याच्या मृत्यूच्या एकूण टक्केवारीच्या २४ टक्के इतकी आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ९५५ बळी -
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १ हजार ९५५ बळी गेले आहेत. त्यात १ हजार ६०८ जण हे ५० किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील आहेत. मृत्यू झालेले उर्वरित ९८५ जण हे आधीच विविध आजारांनी ग्रस्त म्हणजेच को-मॉर्बीड होते. जिल्ह्यात सर्वाधिक ७३५ मृत्यू हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तर त्यापाठोपाठ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात ५२८ जणांचा मृत्यू झाला आहे.
सर्वाधिक मृत्यू असलेले तालुके -
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू हे जळगाव शहरात झालेले आहेत. या ठिकाणी ४६० जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. त्या पाठोपाठ भुसावळ २६८, चोपडा १४३, अमळनेर १२८, रावेर १२७, जळगाव ग्रामीण १०८ आणि जामनेरात १०४ जणांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित इतर तालुक्यांमध्ये देखील दोन आकडी संख्येने कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याच्या दृष्टीने ही अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे.
दररोज सरासरी २० जणांचे मृत्यू -
जिल्ह्यात दररोज सरासरी २० जणांचे मृत्यू होत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. मृत्यूच्या वाढत्या प्रमाणामुळे स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रतीक्षा करण्याची दुर्दैवी वेळ नातेवाईकांवर आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक शहरात ही परिस्थिती आहे. जळगाव शहरात महापालिकेच्या नेरीनाका स्मशानभूमीत तर २४ तासात सुमारे ३० ते ३५ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. काही वेळा तर ओटे शिल्लक राहत नसल्याने जमिनीवर सरण रचून अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी लागत आहे.
गेल्या दोन आठवड्यातील रुग्णसंख्या व मृत्यूसंख्या-
८ एप्रिल - (रुग्ण ११९०, मृत्यू १५)९ एप्रिल- (रुग्ण ११६७, मृत्यू १७)१० एप्रिल- (रुग्ण ११५५, मृत्यू १८)११ एप्रिल- (रुग्ण ११६७, मृत्यू १७)१२ एप्रिल- (रुग्ण १२०१, मृत्यू १६)१३ एप्रिल- (रुग्ण ११४३, मृत्यू १८)१४ एप्रिल- (रुग्ण ९८४, मृत्यू २१)१५ एप्रिल- (रुग्ण ९३४, मृत्यू २०)१६ एप्रिल- (रुग्ण १०३३, मृत्यू २०)१७ एप्रिल- (रुग्ण १११५, मृत्यू २१)१८ एप्रिल- (रुग्ण १०५९, मृत्यू २२)१९ एप्रिल- (रुग्ण ११४७, मृत्यू २४)- गेल्या ७ महिन्यातील मृत्यूची संख्या-
सप्टेंबर २०२०- ३७१
ऑक्टोबर २०२०- ८३
नोव्हेंबर २०२०- ३२
डिसेंबर २०२०- २०
जानेवारी २०२१- २९
फेब्रुवारी २०२१- २७
मार्च २०२१- २४०
१९ एप्रिल २०२१ पर्यंत- ३२९