जळगाव - जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कायम आहे. आज (गुरुवारी) पुन्हा ३१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने जळगाव जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६ हजार ९७० झाली आहे. जिल्हा सात हजारांच्या उंबरठ्यावर कोरोना पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवारी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण कोरोना बळींची संख्या आता ३५८ वर पोहोचली आहे.
जळगाव जिल्हा प्रशासनाला गुरुवारी रात्री प्राप्त झालेल्या तपासणी अहवालांमध्ये ३१६ नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आलेत. त्यात सर्वाधिक ७८ रुग्ण हे जिल्ह्यातील मुख्य हॉटस्पॉट असलेल्या जळगाव शहरात आढळले आहेत. जळगाव पाठोपाठ भुसावळात ४४ रुग्ण आढळले आहेत. त्याचप्रमाणे, जळगाव ग्रामीण १९, अमळनेर १५, चोपडा ७, मुक्तानगर १६, भडगाव १, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १६, रावेर २०, पारोळा ३, चाळीसगाव १५ , पाचोरा ६ तर बोदवड येथे १ नवा रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६ हजार ९७० बाधित रुग्ण आढळले आहेत. समाधानाची बाब म्हणजे, त्यातील ४ हजार २३५ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. गुरुवारी २२७ जणांना कोरोनातून बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला. सद्यस्थितीत २०४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ३५८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात जळगाव शहरातील ७२ वर्षीय पुरुष, जळगाव तालुक्यातील ६० वर्षीय पुरुष, जामनेर तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष व ४७ वर्षीय महिला, भडगाव तालुक्यातील ५५ वर्षीय महिला व अमळनेर तालुक्यातील ७१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.