जळगाव - हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणाचे देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगावात देखील संविधान बचाव कृती समितीसह विविध सामाजिक तसेच राजकीय संघटनांच्या वतीने या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथे दलित समाजातील एका तरुणीवर काही नराधमांनी अमानुषपणे सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला जीवे मारण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनेनंतर पीडित तरुणीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. अतिशय संतापजनक असणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून, देशभरात संतप्त पडसाद उमटले आहेत. या घटनेचा देशभरातुन निषेध व्यक्त होताना दिसत आहे. जळगावात देखील काही सामाजिक व राजकीय संघटना एकत्र येत या घटनेविरोधात रोष व्यक्त केला.
उत्तरप्रदेशात महिला व युवती सुरक्षित नसल्याचे या अमानुष घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या प्रकरणी केंद्र सरकारने दखल घेण्याची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारची भूमिका संशयास्पद आहे. आज हाथरसमध्ये प्रसारमाध्यमे देखील संकटात सापडली आहेत. माध्यमांना पीडितेच्या कुटुंबियांपर्यंत पोहचू दिले जात नाही. सत्य दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही लोकशाहीची हत्या आहे, अशा भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केल्या. तसेच पीडितेला न्याय मिळायला हवा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, उत्तर प्रदेशातील सध्या परिस्थिती लक्षात घेता त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशा मागण्या आंदोलकांच्या वतीने करण्यात आल्या.