जळगाव - बोदवड तालुक्यातील नाडगाव हे भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे गाव आहे. नाडगावमधील ग्रामपंचांयत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, प्रतिभाताई पाटील यांच्या भाचेसुनाचा निवडणुकीत पराभव झाला आहे. समान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढण्यात आली होती, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. दरम्यान या गावात कॉंग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून, ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.
उमेदवारांना समान मते
या ठिकाणी प्रतिभाताई पाटील यांचे भाचे माजी पंचायत समिती सभापती विरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनाकौर विरेंद्रसिंग पाटील यांनी कॉंग्रेसच्या पॅनेलतर्फे उमेदवारी दाखल केली होती. त्यांच्या विरोधात योगिता श्रीकृष्ण लसूनकर यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. या दोन्ही उमेदवारांना 302 अशी समान मते मिळाल्याने, ईश्वर चिठ्ठि काढण्यात आली. यामध्ये योगिता लसूनकर यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने रंजनाकौर या पराभूत झाल्या.
कॉंग्रेसचे पॅनलही पराभूत
नाडगाव ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा होता. मात्र या निवडणुकीत कॉंग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. ग्रामंपचायतीत एकूण सात जागा आहेत, त्यापैकी सहा जागेवर विरोधी उमेदवार विजयी झाले आहेत. माधुरी गवळे या कॉंग्रेसच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. विरोधी उमेदवार हे भाजप, शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या गावातील कॉंग्रेसची सत्ता खालसा झाली असून, या ठिकाणी भाजप, शिवसेना समर्थक गटाची सत्ता आली आहे.