जळगाव - नागरिकत्व सुधारणा विधेयक हे देशात अराजक माजवेल. या विधेयकामुळे धर्माच्या नावाखाली देशाच्या शांततेला धोका पोहोचण्याची भीती आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मागे घ्यावे, या प्रमुख मागणीसाठी बुधवारी जळगावात काँग्रेससह जिल्हा मुस्लिम मंचतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनप्रसंगी नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी विधेयकाच्या प्रतींची जाहीर होळी केली.
जळगाव जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर तर जिल्हा मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. भाजप सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशात जातीपातीचे राजकारण करत आहे. एकीकडे देशासमोर रोजगार, महिला सुरक्षा यासारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे आव्हान आहे. मात्र, त्यावर उपाययोजना करण्याचे सोडून भाजप सरकार धर्माचे राजकारण करत आहे. अशा राजकारणामुळे देशात अराजक माजण्याची भीती आहे.
हेही वाचा - जळगावात पत्नीची हत्या करून पतीची रेल्वेखाली आत्महत्या; १२ वर्षीय मुलीच्या डोळ्यासमोर आईच्या हत्येचा थरार
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत असताना भाजप आपली भूमिका मागे घ्यायला तयार नाही. भाजपच्या या कृतीचा आम्ही निषेध करत असल्याचे आंदोलकांनी यावेळी जाहीर केले.
नागरिकत्व सुधारणा विधेयक हे एका विशिष्ट जाती-धर्माच्या विरुद्ध असल्याच्या भावना काही आंदोलकांनी मांडल्या. यावेळी आंदोलकांनी 'भाजप सरकार मुर्दाबाद, नही चलेगी, नही चलेगी हिटलरशाही नही चलेगी, इस देश में हिंदू-मुस्लिम बटवारा नही सहन करेंगे', अशा घोषणा दिल्या. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
हेही वाचा - गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर अन्याय झाला नसता- एकनाथ खडसे