जळगाव - शहरासह जिल्ह्यातील रुग्णालयांमधून जमा होणाऱ्या जैविक कचऱ्याच्या संकलनात ठेकेदाराने गैरव्यवहार केल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आली आहे. शहरातील दिनेश भोळे नामक व्यक्तीने ही तक्रार केली असून, या तक्रारीची दखल घेत महापालिका प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ठेकेदाराकडून खुलासा मागविण्यात आला आहे.
रुग्णालयांची यादीच लपवली -
जळगाव शहरासह जिल्हाभरातील रुग्णालयांमध्ये जमा होणाऱ्या जैविक कचरा संकलनाचा कंत्राट 'मन्साई बायोमेडिकल वेस्ट' या कंपनीने घेतला आहे. मात्र, या कंत्राटदाराने अटी व शर्तींचा भंग करून, काही रुग्णालयांमधून कचरा संकलन करून देखील त्या रुग्णालयांची यादी महापालिका प्रशासनाकडे सादर केलेली नाही. तसेच मिळणाऱ्या रकमेची रॉयल्टी महापालिकेकडे जमा न करताच प्रशासनाची फसवणूक केल्याची तक्रार दिनेश कडू भोळे यांनी केली आहे.
काय आहे तक्रार -
महापालिकेने २००६ साली 'मन्साई बायो मेडिकल वेस्ट' या कंपनीला शहरातील रुग्णालयांमधून जमा होणारा कचरा संकलित करण्याचा कंत्राट दिला होता. तसेच महापालिकेने जिल्हाभरातून येणाऱ्या जैविक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी या कंपनीला आपल्या हद्दीत बीओटी तत्त्वावर जागा देखील उपलब्ध करून दिली होती. हा करार २० वर्षांसाठी देण्यात आला असून, १ ते ६ वर्षांसाठी कंत्राटदाराला महापालिका प्रशासनाला १३ टक्के रॉयल्टी द्यावी लागणार होती. ६ ते १२ वर्षांसाठी १७ टक्के तर १२ ते मुदत संपेपर्यंत २० टक्के रॉयल्टी द्यायची आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराने जळगाव, भुसावळ व चोपडा शहर येथून जमा होणारी रक्कम मनपा प्रशासनाला दाखवून अनियमित पद्धतीने भरणा केला. तर इतर तालुक्याच्या ठिकाणावरील कचऱ्याची कोणतीही माहिती किंवा त्याबद्दलची रॉयल्टी मनपाकडे देण्यात आलेली नाही, असे भोळे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
प्रशासन मागवणार खुलासा -
दरम्यान, जैविक कचऱ्याच्या संकलनाबाबत भोळे यांची तक्रार प्राप्त झाली असून, याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित ठेकेदाराकडून खुलासा मागवण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक आयुक्त पवन पाटील यांनी दिली.