जळगाव - महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रुपाने अनाचारी, दुराचारी आणि भ्रष्टाचारी सरकार आले आहे. या सरकारला शेतकरी, शेतमजूर, उपेक्षित बारा बलुतेदार, कष्टकरी जनतेच्या अडचणींशी काहीही देणेघेणे नाही. हे सरकार मुंबईपर्यंतच थांबले आहे. अशा शब्दांत भाजप नेते माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. गुरुवारी सायंकाळी ते जळगाव जिल्ह्यात दाखल झाले. त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळी भाजपच्या वसंतस्मृती जिल्हा कार्यालयात ते पत्रकारांशी बोलत होते.
'अनागोंदीचा कारभार सुरू'
मुख्यमंत्री मुंबईपर्यंत, उपमुख्यमंत्री पुण्यापुरते मर्यादित झाले आहेत. तर, सरकारमधील पालकमंत्री आपापल्या मतदारसंघापुरते काम करत आहेत. कुणालाही राज्य आणि आपला जिल्हा अशा पद्धतीने काम करायला रस नाही. प्रचंड अनागोंदीचा कारभार सुरू आहे, असा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. यावेळी आमदार सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, नगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थिती होते.
'राज्याची वाटचाल आज हुकूमशाहीकडे'
राज्य सरकार नुसता वेळकाढूपणा करत आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांशी, समस्यांशी काही देणेघेणे नाही. सरकारमध्ये असलेल्या तिन्ही पक्षातील नेते जनतेच्या प्रश्नांवर बोलायला तयार नाहीत. पण ते आम्ही स्वबळावर लढू, आम्ही आमच्या पक्षाचे संघटन बळकट करू, अशा बाता करत आहेत. जनता अडचणीत असताना यांना हे उद्योग सुचत आहेत. तुम्ही कसे लढणार हे 2024 मध्ये ठरवा. पण आज राज्य चालवायची जबाबदारी तुमच्यावर आहे, ती जबाबदारी कोण पार पाडणार? असा सवाल उपस्थित करून बावनकुळे यांनी, हे राज्य आज हुकूमशाहीकडे, अराजकतेकडे, मुघलशाहीकडे चालले आहे, असा गंभीर आरोप केला. दरम्यान, या सरकारला धडा शिकवण्यासाठी आम्ही 'युवा वॉरियर्स'च्या माध्यमातून काम करत आहोत, असे बावनकुळे म्हणाले.
'सरकारचे मंत्री नाहक मीडिया स्पेस घेतात'
या सरकारमधले मंत्री हे नाहक वेळकाढूपणा करत आहेत. दररोज प्रत्येक जण फालतू विषयांवर नुसता मीडियाचा स्पेस घेतात. एक मंत्री काय बोलतो, तर दुसरा भलतेच बोलतो. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे राज्य आज विकासाच्या दृष्टीने मागे चालले आहे. फडणवीस सरकार असताना राज्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होती. जे राज्य भारनियमनमुक्त झाले होते, ते राज्य आज भारनियमनाकडे वाटचाल करत आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना हे सरकार त्यांना धीर देण्याऐवजी कचाट्यात पकडत आहे. आज शेतकऱ्यांना ट्रान्सफार्मर मिळत नाही, त्यांचे वीज कनेक्शन खंडित केले जात आहे. कोरोना काळातील वीज बिल माफ करण्याची घोषणा सरकारने केली. पण ती प्रत्यक्षात अंमलात आणली नाही. ही जनतेची दिशाभूल आहे. जनता यापुढे सरकारला माफ करणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
'राज्यातील 25 लाख युवावर्गाला भाजपशी जोडणार'
राज्यातील 18 ते 25 वयोगटातील 25 लाख युवावर्गाला जोडण्याचे काम भाजपकडून सुरू आहे. या युवावर्गाला प्लॅटफॉर्म देण्याची गरज आहे. डिसेंबरपर्यंत त्यांची नोंदणी युवा वॉरियर्स म्हणून होणार. त्यांच्या कल्पना, ध्येय, मनातील प्रश्नांवर काम होणार आहे. युवकांना आत्मनिर्भर करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. हा युवावर्ग भविष्यात भाजपच्या पुढच्या पिढीचे नेतृत्त्व करणार, असेही ते म्हणाले.
'उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करावा'
यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, उत्तर महाराष्ट्रात आज दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. पण तिन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्यात लक्ष द्यायला तयार नाहीत. महाविकास आघाडी सरकारमध्ये धमक असेल, तर त्यांनी आजच उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करून शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी मदतीचे विशेष पॅकेज जाहीर करायला हवे, असे आव्हानही बावनकुळे यांनी दिले.
'खडसेच काय तर दिल्ली सोडून कुणी गेले तरी भाजपला फरक पडणार नाही'
ओबीसी आणि बहुजन समाजाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून भाजपवर होणाऱ्या आरोपांबाबत बावनकुळे यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजप हा ओबीसी आणि बहुजनांचा सन्मान करणारा पक्ष आहे. फडणवीस सरकारमध्ये 60 टक्के मंत्री हे ओबीसी होते. आज महाविकास आघाडी सरकार आणि फडणवीस सरकारची तुलना करा. फरक सर्वांच्या लक्षात येईल. एकनाथ खडसे यांनाही पक्षाने खूप काही दिले. मी स्वतः तसेच पंकजा मुंडे यांनाही पक्षाने भरपूर संधी दिली. त्यामुळे पक्षाने अन्याय केला हे खडसेंचे म्हणणे चुकीचे आहे. त्यांच्याबाबतीत एखादा विषय झाला असेल, काही घटना घडली असेल तर लगेचच पक्ष चुकीचा ठरत नाही. एकनाथ खडसे हे पक्ष सोडून गेल्याने, पक्षाचे काही एक नुकसान झालेले नाही. खडसेच काय तर कुणी दिल्ली सोडून गेले तरी भाजपला फरक पडणार नाही. कारण भाजप हा कार्यकर्त्यांवर चालणारा पक्ष आहे, नेत्यांवर नाही, असे म्हणत बावनकुळे यांनी खडसेंच्या आरोपांचाही समाचार घेतला.
'ओबीसी आणि मराठा आरक्षण जाण्यास राज्य सरकारच जबाबदार'
ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य सरकारला जबाबदार ठरवले. मराठा आरक्षण देताना फडणवीस सरकारने सर्व तांत्रिक बाबी तसेच कायदेशीर प्रक्रिया चाचपडून पाहिली होती. ते आरक्षण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय टिकवले होते. परंतु, राज्य सरकार आता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याने, मराठा आरक्षण गेले. तशीच परिस्थिती ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत घडली. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात निकाल देताना राज्य सरकारला 'एम्पिरिकल डाटा' गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, आता राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवून ओबीसींची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही बावनकुळे यांनी सांगितले.