जळगाव - शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे. पराभवाची कारणे लिहायला त्यांनी सुरुवात केली आहे, अशी टीका राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जळगावामध्ये केली. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बारामतीमध्ये जर भाजपच्या उमेदवार कांचन कुल निवडून आल्या तर बारामतीकरांचा ईव्हीएम यंत्रावरचा विश्वास उडेल' असे वक्तव्य शरद पवारांनी केले होते. त्यासंदर्भात बोलताना पाटील पुढे म्हणाले की, ईव्हीएम काँग्रेसनेच आणले. ४ राज्यात भाजपचा पराभव झाला तेव्हा यांना ईव्हीएम चालले. पण भाजपचा विजय झाला की ईव्हीएममध्ये गडबड असल्याचे सांगितले जाते. हा देश कायद्यावर चालतो, असे पाटील म्हणाले.
या देशाचा निवडणूक आयोग स्वायत्त आहे. न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश द्यावा, की ईव्हीएम बंद करावे. त्यानंतर चिठ्ठ्याही कशाला ? लोकांचे हात वर करून मतदान घ्यावे. आमचे काहीही म्हणणे नाही. या देशाची व्यवस्था नाकारणे हा काँग्रेसने उद्योग चालवला आहे. उलट भाजपवर, मोदींवर आरोप केले जात आहेत की देशाची व्यवस्था, घटना भाजपला मान्य नाही. घटना तर त्यांनाच मान्य नाही म्हणून ते न्यायव्यवस्थेचा निर्णय मानत नाहीत, असेही पाटील यावेळी म्हणाले.
हाच आमचा विजय-
आतापर्यंत बारामतीमध्ये किती मताधिक्क्याने विजय होणार, अशी चर्चा चालायची. पण या वेळेला सांगता येत नाही बुवा, या पर्यंत आम्ही निवडणूक आणून ठेवली आहे. हाच आमचा विजय आहे. शरद पवारांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे. सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहेत. पवार कुटुंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही, हे मी ठामपणे सांगेल. आता सातत्याने मला लक्ष्य करून आरोप प्रत्यारोप करत आहेत. बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे. प्रत्येक माणूस शेवटी कुटुंबाचा विचार करतोच, अशी खिल्ली देखील चंद्रकांत पाटीलांनी उडवली.