जळगाव - ओला दुष्काळाच्या पाहणीसाठी शुक्रवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय समितीच्या सदस्यांना दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 5 तास वाट पाहिल्यानंतर केंद्रीय पथक रात्री साडेसात वाजता दाखल झाले. त्यानंतर अवघ्या 5 मिनिटात पाहणी आटोपल्याने शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
हेही वाचा - बीड : केंद्रीय पथक पाहणीसाठी येण्याआधीच शेतकऱ्याची आत्महत्या; निपाणी टाकळी येथील घटना
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शेतकरी कल्याण विभागाच्या जयपूर येथील प्रकल्पाचे संचालक डॉ. सुभाष चंद्र, केंद्रीय वित्त मंत्रालय विभागाचे सल्लागार दिना नाथ यांनी पारोळा तालुक्यातील मोंढाळे शिवारात भेट देवून शेतकऱ्यांशी धावता संवाद साधला. झालेल्या नुकसानीची माहिती काही मिनिटातच जाणून घेत त्यांनी काढता पाय घेतला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणेही त्यांनी टाळले.
यावेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, एरंडोलचे उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, कृषी उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते. दरम्यान, हे पथक शनिवारी जळगाव, पाचोरा, भडगाव तालुक्यातील काही गावांमध्ये नुकसानीची पाहणी करणार आहे.
हेही वाचा - पुणे महापालिकेच्या महापौरपदी मुरलीधर मोहोळ यांची बहुमताने निवड