जळगाव - जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतर्गत 'कोरोना' कक्षात दाखल झालेल्या 49 वर्षाच्या व्यक्तीचे नमुने पॉझिटिव्ह असल्याचा तपासणी अहवाल शनिवारी रात्री प्राप्त झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना प्राप्त झालेला हा तपासणी अहवाल अवघ्या अर्ध्याच तासात सोशल मीडियावर व्हायरल झाला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाधित रुग्णाचे नाव, गाव रहिवासाचे ठिकाण गोपनीय ठेवण्याचे निर्देश असताना तपासणी अहवाल व्हायरल होऊन संबंधित रुग्णाची ओळख समोर आली. सोशल मीडियातूनच यावर तीव्र आक्षेप नोंदवला जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी रविवारी अहवाल व्हायरल करण्याऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उमेश पाटील यांच्या फिर्यादीवरून कलम-188 प्रमाणे जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासणी अहवाल व्हायरल करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने अहवाल व्हायरल करून संबंधित रुग्णाची ओळख उघड केली. त्यामुळे रुग्णाच्या बदनामीस कारणीभूत ठरल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील पुढील तपास करत आहे.