जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दौरा करत असलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला. ही घटना आज (बुधवारी) रात्री साडेसात ते आठच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर घडली. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही.
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. नाशिक जिल्ह्याचा दौरा आटोपून ते भाजपचे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या कुटुंबीयांच्या सांत्त्वनासाठी आज (बुधवारी) रात्री ते यावल तालुक्यातील भालोद येथे निघाले होते. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळ मुसळधार पावसामुळे त्यांच्या ताफ्यातील एका वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे नियंत्रण सुटलेले वाहन पुढे चालणाऱ्या वाहनाला धडकले. या वाहनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर बसलेले होते. या अपघातानंतर प्रवीण दरेकर हे देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनात बसून पुढील प्रवासाला निघाले. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मात्र, ताफ्यातील दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले.